swt110.jpg
74407
सिंधुदुर्गनगरीः येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी धरणे आंदोलन छेडले.
सिंधुदुर्गनगरीत १०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘धरणे’
मागण्यांकडे दुर्लक्ष ः ‘समान काम, समान वेतन’चा नारा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ ः १०८ रुग्णवाहिका चालकांना ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वावर वेतन व भत्ते अदा करण्यात यावेत. आरोग्य आणि सोसायटीचे कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.
राज्यातील १०८ रुग्णवाहिका वाहनचालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत. त्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई आझाद मैदान येथे १३ मे रोजी आंदोलन करून निवेदन सादर केले होते. यावेळी १०८ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. १०८ रुग्णवाहिका चालकांच्या मागण्यांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही शासन स्तरावर किंवा सेवा पुरवठादार यांच्याकडून झालेली नाही. त्यामुळे चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
१०८ रुग्णवाहिका वाहन चालक गेली अनेक वर्षे अल्प वेतनावर काम करत आहेत. रुग्णवाहिकांची स्थिती ही अत्यंत वाईट आहे. वाहन चालकांकडून ज्यादा काम करून घेतले जाते. परंतु, त्यांना अधिकचा कुठलाही मोबदला दिला जात नाही. याबाबत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज संपूर्ण राज्यभरासह जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी काम बंद आंदोलन पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे.
१०८ ही रुग्णवाहिका सेवा अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे मागण्यांची पूर्तता झाली नसली, तरी वाहन चालक अविरत सेवा बजावत आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये, रुग्णांचा जीव वाचावा, यासाठी रात्रंदिवस कार्यरत राहूनही शासन १०८ रुग्णवाहिका चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नाविलाज म्हणून काम बंद आंदोलन करावे लागले असल्याचे आंदोलन करणाऱ्या वाहन चालकांचे म्हणणे आहे, तरी शासनाने याचा विचार करावा व तातडीने मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्ह्यातील १२ कार्यरत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेद्वारे सेवा पुरवणारे जिल्ह्यातील २८ वाहन चालक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यामध्ये १०८ रुग्ण वाहिका चालक यूनियनचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तुकाराम पाटील, सचिन सावंत, बाळकृष्ण कोरगावकर, रोहित देसाई, स्वप्निल गाडगे, एकनाथ देसाई आदींसह जिल्ह्यातील वाहनचालक सहभागी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना मागण्यांबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी डॉ. शाम पाटील उपस्थित होते.
चौकट
काय आहेत प्रमुख मागण्या?
* शासकीय सेवेत कायम असलेल्या वाहन चालकाप्रमाणे समान काम समान वेतन व भत्ते अदा करावेत.
* आरोग्य आणि सोसायटीचे कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी.
* आठ तासांपेक्षा जादा कामाचा मोबदला सामान्य आठ तासांच्या वेतनाच्या दुप्पट दराने देण्यात यावा
* सर्व प्रकारच्या पगारी रजा नियमित देण्यात याव्यात.
* वार्षिक पगाराच्या ८.३३ टक्के बोनस अदा करावा.
* मूळ वेतन व महागाई भत्त्यात वार्षिक वाढ देण्यात यावी.
* धुलाई भत्ता मासिक दोन हजार रुपये अदा करण्यात यावा.
* वेतन दरमहा १० तारीखच्या आत देण्यात यावे.
* पाच वर्षे सेवापूर्ण झालेल्या चालकांना कायद्यानुसार ग्रॅज्युएटी देण्यात यावी.
* रुग्णवाहिका चालकांचा गणवेश पांढरा शर्ट व निळी पॅन्ट करावी.
* शासकीय नोकर भरतीमध्ये विशेष आरक्षण द्यावे.
* नव्या रुग्णवाहिका सेवेत दाखल कराव्यात.
* रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्ती नियमित व वेळेत करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.