‘खेमराजीय’चे शुक्रवारी
सावंतवाडीत प्रकाशन
सावंतवाडीः श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (ता. ४) सकाळी १० वाजता श्रीमंत मेजर खेमसावंत (पंचम) तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या ८८ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ‘खेमराजीय’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन होणार असून ‘प्रशासकीय सेवेतील संधी’ या विषयावर मार्गदर्शनही केले जाणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष खेमसावंत भोसले भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, नियामक मंडळ सदस्य आणि सर्व सभासदांच्या वतीने आयोजित केला आहे.
....
कणकवली उपकार्यकारी
अभियंता पाटील रुजू
कणकवलीः तालुक्यासाठी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार संदीप पाटील यांनी स्वीकारला. शहरासह ग्रामीण भागातही अखंडित वीजपुरवठा सुरू राहण्याच्या दृष्टीने आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले. येथील उपकार्यकारी अभियंता विलास बगड यांची कल्याण येथे बदली झाल्यानंतर रिक्त पदी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पाटील हे कोल्हापूर येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. गाव पातळीवर काम करणाऱ्या लाईनमनांनी ग्राहक सेवेला प्राधान्य देताना नागरिकांचे फोन उचलणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे महत्वाचे आहे. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याबाबतची माहितीही देणे आवश्यक असून यासाठी गावपातळीवर सरपंचांसह आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते यांचा व्हॉटस्अॅप ग्रुप करून त्यावर माहिती दिल्यास ते सोईचे होऊ शकते, असे पाटील यांनी सांगितले.
.....................
भरड येथे आज
दशावतारी नाटक
मालवणः भरड दत्त मंदिर येथे बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ, कोळंब भटवाडी मालवण यांची देवसेवा निमित्ताने उद्या (ता. २) सायंकाळी ७ वाजता बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तालुक्यातील नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ, कोळंब भटवाडीतर्फे केले आहे.
.......................
एडगाव-करुळ
रस्त्याची दुर्दशा
वैभववाडी : वैभववाडी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एडगाव ते करुळ त्याचप्रमाणे तळेरे-वैभववाडी दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून अर्धवट कामामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने तत्काळ रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालक, प्रवाशांमधून केली जात आहे. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले दीड वर्ष सुरू आहे; मात्र एडगाव ते करुळ दरम्यान दोन ठिकाणी काम अर्धवट असल्यामुळे त्या ठिकाणी चिखल झाला आहे. या चिखलातून जाताना दुचाकी, रिक्षा, मोटारकार चालकांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागत आहे.
....................
तेली समाजातर्फे
२७ ला गुणगौरव
कणकवलीः सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव समारंभ २७ जुलैला सकाळी १० वाजता कणकवली बस स्थानकासमोरील हॉटेल उत्कर्षा येथे आयोजित केला आहे. सभेला मंडळाच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे. यावेळी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात २०२५ च्या दहावी परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त, बारावी परीक्षेत ८० टक्के व त्यापेक्षा जास्त, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथमश्रेणी, शिष्यवृत्तीधारक, यूपीएससी, एमपीएससी परीक्षेत यशस्वी गुणवंतांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत संस्थेकडे १५ जुलैपर्यंत पाठवावी. पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सन्मान पुरस्कार प्राप्त ज्ञातीतील भगिनींनी पुरस्कार प्रमाणपत्राची प्रत पाठवावी. शैक्षणिक, आर्थिक मदतीचे अर्ज तालुकाध्यक्ष, सचिव किंवा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांच्या शिफारशीने पाठवावेत. अधिक माहितीसाठी तुकाराम तेली, चंद्रकांत तेली, शैलेंद्र डिचोलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.