प्लास्टिक संकलनासाठी होम मिनिस्टर स्पर्धा
विशाल भोसले ः चिपळुणात १५ दिवस प्लास्टिक जमा करणाऱ्या महिलांना कुपन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः चिपळूण पालिका, सह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि ‘नाटक कंपनी चिपळूण’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्लास्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्लास्टिकच्या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने पाहत पालिकेने यावर्षी जोरदार मोहीम राबवण्याचा निर्धार केला असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘चिपळूण होम मिनिस्टर २०२५’ ही विशेष स्पर्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
चिपळूण शहरातील स्वच्छता मोहिमेला चालना देण्यासाठी यापूर्वीच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते ओंकार भोजने यांची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत चिपळूणमधील शाळा, संस्था, सामाजिक मंडळे यांच्याशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकमुक्तीसाठी जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर महिलांना या उपक्रमात सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी आता ‘चिपळूण होम मिनिस्टर २०२५’ ही स्पर्धा जाहीर करण्यात आली. ही स्पर्धा १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. चिपळूण शहरातील कोणतीही महिला या स्पर्धेत भाग घेऊ शकते. महिन्यातून पंधरा दिवस प्लास्टिक जमा करणाऱ्या महिलांना विशेष कुपन्स देण्यात येणार आहेत. या कुपनांच्या आधारे लकी ड्रॉ घेण्यात येईल आणि विजेत्या महिलेला मानाची पैठणी प्रदान करण्यात येणार आहे. याच दिवशी खेळण्यात येणाऱ्या ''होम मिनिस्टर'' या विशेष खेळातून अंतिम विजेतीची निवड होणार असून, या विजेतीला सोन्याची नथ भेट दिली जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल. विशेष म्हणजे, या मोहिमेत इतर महिलांना सहभागी करून घेणाऱ्या महिलांनाही विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ प्लास्टिक गोळा करणे नसून, शहरातील महिलावर्गात पर्यावरणीय भान निर्माण करणे, त्यांच्यातील नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणे आणि सामाजिक सहभाग वाढवणे हा आहे. या उपक्रमासाठी नावनोंदणी करण्यासाठी इच्छुक महिलांनी पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
संकलनासाठी गाडी घरी येणार
प्लास्टिक संकलनासाठी पालिकेकडून नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. नावनोंदणी केल्यानंतर प्लास्टिक नेण्यासाठी संबंधिताला संदेश पाठवला जाईल. त्यानंतर गाडी घरी येऊन प्लास्टिक घेऊन जाईल आणि कुपन देईल. या संपूर्ण मोहिमेचे मार्गदर्शन मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्गमित्रचे संचालक भाऊ काटदरे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.