75711
आंबा बागायतदारप्रश्नी लवकरच बैठक
पालकमंत्री नीतेश राणे; देवगडमधील मोर्चानंतर बागायतदारांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत फळपीक विम्यासह विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यात आले. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काही प्रश्नांची उकल करण्यासह लवकरच संबधित फळपीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत जिल्ह्यात बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी यावेळी आश्वासित केले. बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून आलेल्या प्रश्नांना न्याय देऊन शेतकरी समृद्ध होण्यासाठी प्रयत्न राहतील, असेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या विविध समस्यांची सोडवणूक होण्याच्या अनुषंगाने शासनाला जाग आणण्यासाठी तालुका आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघातर्फे नुकताच मोर्चा काढला होता. याचधर्तीवर पालकमंत्री राणे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री श्री. राणे यांच्यासह माजी आमदार अॅड. अजित गोगटे, बाळ खडपे, प्रकाश राणे, आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रुमडे, तहसीलदार आर. जे. पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील आदी उपस्थित होते.
श्री. राणे यांनी शेतकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. यामध्ये यंदाच्या हंगामात अचानक झालेली उष्णता वाढ यासह अवकाळी पावसामुळे झालेले आंबा नुकसान, फळपीक विमा भरपाई मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, सदोष हवामान अंदाज यंत्रणा, वानरांकडून होणारे शेती नुकसान याबरोबरच खते किटकनाशके यांच्यावरील जीएसटीचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीतून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
श्री. राणे म्हणाले, ‘‘राज्याच्या कृषिमंत्र्यांकडून समस्यांची उकल करण्याआधी शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न, अडचणी समजून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. फळपीक विम्यासंदर्भात संबधित कंपन्याच्या प्रतिनिधींसोबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढला जाईल. यावेळी शासनाचे वरिष्ठ अधिकारी बोलावण्यासाठी प्रयत्न राहतील. निकष ठरवताना भौगोलिक परिस्थितीचा विचार झाला पाहिजे. कृषी विभागानेही अहवाल तयार करताना सर्व निकष नजरेसमोर ठेवले पाहिजेत. नैसर्गिक बदलामुळे झालेल्या नुकसानीतून शासनाकडून अधिकाधिक भरपाई मिळवून देण्यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यासह मांडलेल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न राहील.’’
अॅड. गोगटे यांनी, हवामान यंत्रणेची देशभाल दुरूस्ती झाली पाहिजे. हवामान अंदाज हा गंभीर विषय आहे. हवामानाचा अंदाज कृषी विभागाने सामान्य शेतकऱ्यांसाठी खुला करावा. प्रमाणित खते, किटकनाशके कळत नाहीत असे सांगितले. सभेला रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्रातील किटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर आदी उपस्थित होते. संजय धुरी यांनी आभार मानले.
.................
‘विमा हप्ता परतावा द्या’
गतवर्षी तालुक्यातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेतला होता. एकूण सुमारे ३ कोटी २८ लाख रूपये विमा हप्ता भरूनही केवळ ५४ लाख ६० हजार रूपयेच भरपाई देण्यात आली. वाढीव तापमानामुळे आंब्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे विमा हप्ता परतावा मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.