गोठोस तलाठ्यांच्या
चौकशीचे आदेश
सावंतवाडी ः माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांच्या माहितीच्या अधिकाराखालील लढ्याला अखेर यश मिळाले आहे. राज्य माहिती आयोगाने, कोकण खंडपीठाने गोठोस तलाठ्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करत कुडाळ तहसीलदारांना या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. हे प्रकरण सन २०२१ मध्ये सुरू झाले. जेव्हा बरेगार यांनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी कुडाळ तहसीलदार यांच्यामार्फत गोठोस तलाठी यांच्या ऑक्टोबर २०१७ ते नोव्हेंबर २०१७ आणि ऑक्टोबर २०२१ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीतील शासकीय दैनंदिनीची मागणी केली होती. सुरुवातीला गोठोसच्या तलाठ्यांनी माहिती देण्यास संमती दर्शवली आणि ५० रुपये मनीऑर्डरद्वारे पाठविण्यास सांगितले. बरेगार यांनी त्वरित मनीऑर्डर पाठवली. मात्र, त्यानंतर तलाठ्यांनी अचानक आपली भूमिका बदलली आणि मागितलेली माहिती वैयक्तिक असल्याचे कारण देत माहिती देण्यास नकार दिला होता.
----
मालवण धुरीवाड्यात
अखंड हरिनाम सप्ताह
मालवण ः धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शुक्रवारी (ता. ११) रात्री १० वाजता चित्ररथ देखाव्यासहित ग्रामस्थ दिंडी, शनिवारी (ता. १२) दुपारी १२ वाजता हरिनाम सप्ताह सांगता, दिंडी, नवस बोलणे व फेडणे, दुपारी ३ वाजता गोपाळकाला, सायंकाळी ६ वाजता घटविसर्जन मिरवणूक सोहळा, मंगळवारी (ता. १५) दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
कुसरवेवाडीत उद्या
गुरुपौर्णिमा उत्सव
मसुरे ः मालवण तालुक्यातील कुसरवेवाडी येथील प. पू. राणे महाराज मठात गुरुवारी (ता. १०) गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन राणे महाराज ट्रस्ट व राणे महाराज भक्तगण यांच्यातर्फे करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता राणे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक व पादुका पूजन, ११ वाजता हरिनाम जप व नामस्मरण, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने, रात्री ८ वाजता महाआरती, ९ वाजता महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.....................
साटेली येथे घराचे
पावसामुळे नुकसान
दोडामार्ग ः तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साटेली-कदमवाडी येथे एका घराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. ७) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. या पावसामुळे साटेली-कदमवाडी येथील राजन कदम यांच्या राहत्या घराचा काही भाग कोसळला. घराचा एक खांब कोसळल्याने वासे, कौले मोडून पडली. घरात राहणारे कुटुंब सुदैवाने सुरक्षित असून, आवाज ऐकून वेळेवर घराबाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक आघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच, तालुका प्रशासनाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाने या घटनेचा पंचनामा केला.
......................
तेंडोलीत शनिवारी
‘रामभक्त सूरत’
कुडाळ ः तेंडोली-वरची आदोसवाडी येथील पिंपळेश्वर कला-क्रीडा मंडळातर्फे शनिवारी (ता. १२) सायंकाळी सात वाजता तेथील कुलस्वामिनी मंदिरात जिल्ह्यातील निवडक दशावतार कलाकारांचे ‘रामभक्त सूरत’ हे संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. यात गणपती-विनायक सर्वेकर, रिद्धीसिद्धी-चैतन्य गावडे, सूरत राजा-संजय काळे, राम-विलास तेंडोलकर, लक्ष्मण-गिरीश राऊळ, सीता-नितीन घाडी, शत्रुघ्न-साहिल तळकटकर, ब्राह्मण-कृष्णा घाटकर, नारद-पंढरी घाटकर, अंगज-किरण नाईक, मारुती-दत्तप्रसाद तवटे, राणी पद्मावती-गौतम केरकर, यमदाजी सावंत यांच्या भूमिका आहेत. संगीत साथ हार्मोनियम-अमोल मोचेमाडकर, मृदंग-दादा आकेरकर व तालरक्षक-विनायक राऊळ यांची आहे. नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.