rat१४p५.jpg-
P२५N७७४०५
राजापूर ः शेतकऱ्यांसमवेत नांगरणी करताना विद्यार्थी.
---
‘सोलगाव’तील विद्यार्थी रमले भातशेतीत
शेताच्या बांधावर उपक्रम ; शिक्षकही सहभागी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ : विविध कारणांमुळे शेतीमधून मिळणारे कमी उत्पन्न असल्याने शेतीचे क्षेत्र घटत आहे. शेतीविषयी मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी सोलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भातलावणीचा अनुभव घेतला. ‘एक तास शेताच्या बांधावर’ या उपक्रमांतर्गत ही संकल्पना राबवण्यात आली आहे. शाळेतील मुख्याध्यापक दीपक धामारपूरकर यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
विविध कारणांमुळे शेतीचे क्षेत्र घटत चालले असून, त्याबाबत सर्वांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. शेतीचे क्षेत्र घटताना या क्षेत्रापासून युवावर्गही दुरावला आहे. तालुक्यातील सोलगाव येथील जिल्हा परिषद शाळा नं. २ मधील मुख्याध्यापक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रप्रमुख लक्ष्मण फाटक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसोबत काही तास घालवले. शेतात सहभागी होताना विद्यार्थ्यांनी नांगरणीसह जमिनीची मशागत करणे, भातलावणी करणे आदी विविध प्रकारची कामे विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही यामध्ये सहभागी झाले होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्याध्यापक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक फडके, सपकाळ, मंगे, पुष्पमाला नांगरेकर, सतीश कामतेकर, चैत्राली तिर्लोटकर, दीपाली नांगरेकर, राजश्री कामतेकर, दामोदर नांगरेकर, वासंती कामतेकर, वंदना कामतेकर, वनिता परवडी आदींनी मेहनत घेतली.