दखल.........लोगो
(८ जुलै टुडे १)
घरपोच वस्तू पुरवण्याची सेवा देणाऱ्या आस्थापनेकडून एक किस्सा नुकताच सांगितला गेला. एक गृहस्थ दररोज दोन चहा मागवत. दोन चहा आणून देणाऱ्या तरुण मुलासोबत बसून आपण एकत्र चहा पिऊ, असे सांगत. ते दोघे एकत्र सोबतीने चहा घेत. या किश्शाला कारूण्याची किनार आहे. आजच्या आपल्या समाजातील वृद्ध एकाकी लोकांची ही कहाणी आहे. यावर एक आणि एकच उपाय नाही; मात्र सामाजिक भान, सहवेदना, कळवळा, आपुलकी आणि समाजात एकाकी असलेल्यांना समजून घेण्याची वृत्ती असेल तर उपाय शक्य आहे. असे एकाकीपण ही अनेक वृद्धांची समस्या आहे. त्यांना माणसाच्या सोबतीची किमान माणसांनी त्यांच्याशी जाऊन संवाद साधण्याची गरज आहे. प्रामुख्याने ही गरज भावनिक आहे. त्यासाठी व्यक्तिगत वा संघटित पातळीवर प्रयत्न करता येतील.
- शिरीष दामले, रत्नागिरी
--
ज्येष्ठांच्या भावनिक गरजांवर आपुलकीची फुंकर
सकाळ वृत्तसेवा
एकाकी ज्येष्ठ नागरिकांच्या भौतिक गरजाही आहेतच; परंतु त्यासाठी सेवा देणाऱ्या संस्था अथवा आस्थापना आहेत. त्यांचा व्यवहार रोकडा असला तो व्यवसायाचा भाग असला तरी त्याला मानवी चेहरा आहे. आज गावागावातून शहराशहरातून लोकांचे आयुष्यमान वाढल्यामुळे वृद्धांची, ज्येष्ठांची संख्याही वाढली आहे. त्यांची पुढची पिढी त्यांच्यापासून दुरावली नसली तरी दूर गेलेली आहे. खरेतर, वृद्धांना त्यांचे जगण्याचे हक्क, हे फक्त त्यांची मुले-बाळे आणि त्यांनी कमावलेली संपत्ती याबाबत नाहीत. ते तर समाजाने मानले पाहिजे आणि त्यांना ते मिळावेत यासाठी व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहे. आज विचार करायचा आहे तो प्रामुख्याने भावनिक अंगाने.
साधारणतः पाच वर्षांपूर्वी चिपळूण येथे एका वृद्ध दाम्पत्याने घरातच आत्महत्या केली. त्यांचे घर वस्तीपासून एकाकी नव्हते; पण वेगळा बंगला होता. आज मध्यमवर्ग अथवा उच्च मध्यमवर्ग यांच्यातील वृद्ध अशाच पद्धतीने राहतात. दाम्पत्याची आत्महत्या तीन दिवसानंतर उघड झाली कारण, अज्ञात होते. ही शोकांतिका होती. संध्या छाया आपल्या उंबरठ्याशी आल्याचे द्योतक होते. त्याची जाणीव शोकांतिकेमुळे झाली ही खेदाची बाब. सुरुवातीलाच दिलेल्या किश्शातूनही ती लक्षात येते. तेवढी संवेदनशीलता मात्र हवी.
ज्येष्ठांच्या एकाकीपणावर त्यांचे समाजात मिसळणे किंवा समाजातील काही लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधणे हा मोठा उतारा आहे. स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्थातील राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, स्काऊट गाइड याचे विद्यार्थी यांसह काही वेगळे प्रकल्प करणारे विद्यार्थी, महिला मंडळं, ज्येष्ठ नागरिक संघ या साऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली तर हे एकाकीपण काही प्रमाणात कमी होऊ शकेल. सुरुवातीला हे थोडे कृत्रिम वाटेल; परंतु आठवड्यातील काही नेमका वेळ अथवा दिवस संवाद साधता आला, भेट शक्य झाली तर त्यांच्या गरजा समजावून घेता येतील. मदतही करता येईल. ज्येष्ठ आणि संवाद साधणारे यांच्यात भावबंधही निर्माण होऊ शकतात. या वृद्धांच्या गरजा छोट्या छोट्या असतात. कोणाला औषध, कोणाला सिलिंडर आणून हवा, कुणाला कीर्तनाला व कार्यक्रमाला जायचे आहे, कोणाला एखाद्या विवक्षित ठिकाणी, बँकेत अथवा सरकारी कार्यालयात जाण्यासाठी सोबत हवी आहे अशी एक ना अनेक कामे असू शकतात. त्यांच्याशी बोलणे त्यांना चार गोष्टी माहिती करून देणे महत्त्वाचे. त्या वेळी संयम राखून त्यांच्या चार गोष्टी ऐकणेही महत्त्वाचे आहे. काही महिलांनी संघटितपणे आजी-आजोबांची नावे निश्चित करून त्यांच्याशी संवाद साधता येईल. हे काम अगदी कोरडे नाही त्यात आपुलकी आहे . काहींना या कल्पनेत भाबडेपणा वाटू शकतो; परंतु तसा तो नाही.
यापूर्वी सर्वसाधारणपणे घरगुती पातळीवर एकमेकांची नाती जपत नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या गोष्टी आता आयत्या आणल्या जातात, ही बदलणारी संस्कृती प्रामुख्याने स्वयंपाकघरापर्यंत पोचली आहे. यापूर्वी दहा दिवसाचा गणपती आता समाजातील सर्वच स्तरात हळूहळू दीड दिवसावर आला आहे कारण, पुढील पिढी दहा दिवस गणपती उत्सव करण्यास वेळ देऊ शकत नाही. हा बदल आपण स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे एकाकी झालेल्या आजी-आजोबांचा संवाद खुंटू न देता त्यांच्याशी बोलत राहण्याची सुरुवात तर शक्य आहे.