कोकण

‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ

CD

77962


‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ

राजू शेट्टी; सिंधुदुर्गातून साथ मिळाली नाही तरी ठाम विरोधच

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः महाराष्ट्र शासनाकडून होऊ घातलेला शक्तिपीठ महामार्ग हा स्वार्थपीठ आहे. या महामार्गामुळे राज्य कर्जाच्या खाईत लोटणार असून हा महामार्ग रद्द होण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहीन. प्रसंगी कोणी मला फटके मारून हा महामार्ग रद्द होत असेल तर ते फटकेही खायलाही तयार आहे. प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याने साथ दिली नाही तरीही हा महामार्ग रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे मांडली.

श्री. शेट्टी हे सावंतवाडीत आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, कॉम्रेड संपत देसाई, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, रुपेश राऊळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गुडेनवर, प्रांतिक सदस्य संग्राम कुपेकर, कोल्हापूर जिल्ह्याचे ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश चौगुले, मनसेचे जिल्हाप्रमुख विद्याधर गुटवे, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. मळवीकर आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्गविरोधात आम्ही उभा केलेला लढा हा राजकीय नाही तर तो भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. पर्यावरण वाचविण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसाधारण जनतेला महापुरापासून वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी लढा उभारला आहे. शासन या महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, सरकारच्या कार्यपद्धतींचा विचार करता कुठलाच प्रकल्प हा सांगितलेल्या रकमेत पूर्ण झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. शक्तीपीठ हा प्रकल्प दीड लाख कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे आणि हा खर्च शासनाला परवडणारा नसून राज्य कर्जाच्या खाईत लोटणार आहे. एकीकडे पुणे-बेंगलोर हा आठ पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग ७०० किलोमीटर लांबीचा ५० हजार कोटींमध्ये होणार आहे. मात्र, ८०२ किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग हा सहा पदरी असताना त्याला ८६ हजार कोटी एवढा खर्च नेमका कशाला? त्यामुळे या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून सरकार भ्रष्ट मार्गाने पन्नास हजार कोटी रुपये काढणार आहे आणि ते पन्नास हजार कोटी जनतेच्या खिशातून जाणार आहेत आणि म्हणूनच देवाधर्माच्या नावाखाली जनतेच्या माथी लादल्या जाणाऱ्या या महामार्गाला आमचा विरोध आहे.’’
श्री. शेट्टी पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातून जाणाऱ्या या महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देऊ, अशी धमकी या ठिकाणी दिली जात आहे. मात्र, जर खरोखरच हा महामार्ग रद्द होत असेल तर ते फटके खायची तयारी माझी आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणे सिंधुदुर्गानेही या महामार्गाच्या विरोधात लढा उभा करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गची साथ नाही मिळाली तरीही या महामार्गाच्या विरोधात अखेरपर्यंत लढत राहणार आहे.’’ शक्तीपीठ महामार्गामुळे स्थानिकांचा विकास होईल, असे गोड स्वप्न दाखवले जात आहे. मात्र, एक्स्प्रेस असणाऱ्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूने संरक्षण भिंत असणार आहे. या महामार्गावरून दुचाकींना प्रवेश असणार नाही तसेच तीस किलोमीटर अंतरावर एक जंक्शन राहणार आहे. त्यामुळे स्थानिकांचा विकास नेमका कसा होणार? हा प्रश्न आहे.’’
--------------
एका उद्योग समूहासाठी ‘शक्तीपीठ’चा घाट
मुळात अर्धवट राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी ताकद लावण्याची गरज असताना शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य शासन आपली ताकद पणाला लावत आहे. यामागे गडचिरोली या ठिकाणी एका मोठ्या उद्योग समूहाच्या मायनिंग प्रकल्पातील मायनिंग खासगी बंदरातून निर्यात करण्यासाठी या महामार्गाचा घाट घातला जात आहे. त्यामुळे काही झाले तरी पर्यावरणाचा ऱ्हास करून भूमिपुत्रांना बेघर करत आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा हा महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही, असे श्री. शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
-------------------
तसा कुठलाही बदल राज्याने केला नाही
स्थानिक आमदार दीपक केसरकर हे तर हा महामार्ग सिंधुदुर्गातून पूर्वी ज्या भागातून जात होता तो भाग वगळून आता दुसऱ्या मार्गाने जाणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, तशा प्रकारचा कुठलाही बदल राज्य सरकारने केला नाही आणि आमदार केसरकरांच्या मते, तो दुसऱ्या बाजूने नेला तरी तेथील डोंगरातून बोगदा मारून तो पलीकडे कसा नेणार? त्या ठिकाणी उत्खनन होणार नाही का? तेथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटणार नाहीत का? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे श्री. शेट्टी यावेळी म्हणाले.
----
श्री पत्रादेवी चरणी साकडे
बांदा ः प्रस्तावित पवनार-पत्रादेवी हा ८०२ किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग झाल्यास कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास होणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची समस्या उद्भवेल. २७ हजार एकर जमीन खरेदी करून ५५ हजार शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारा हा प्रकल्प आहे. राज्याला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे, असे साकडे विरोधी संघर्ष समितीचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी श्री पत्रादेवी चरणी घातले. महाराष्ट्र-गोवा सीमेवरील श्री पत्रादेवी देवस्थानला त्यांनी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Latest Marathi News Updates : राज ठाकरेंचा उद्या मीरा रोड दौरा

SCROLL FOR NEXT