क्षमता २७० ची, अर्ज फक्त ६८ विद्यार्थ्यांचे
अध्यापक महाविद्यालयांची स्थिती ; डीएड्कडील कल होतोय कमी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : जिल्ह्यातील दोन खासगी व दोन शासकीय अध्यापक महाविद्यालयातील प्रवेशक्षमता २७० असताना या सर्व ठिकाणी मिळून फक्त ६८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. शिक्षकभरतीच होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा डीएड् अभ्यासक्रमाकडील कल कमी होत आहे.
दोन वर्षाचा डीएड् अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी हमखास मिळत असे. आता डीएड् पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी टीईटी परीक्षा सक्तीची झाली आहे. या परीक्षेच्या काठिण्य पातळीमुळे पास होण्याचे प्रमाण अवघे दोन ते तीन टक्के आहे. त्यामुळे पास होणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षक होण्याचे अनेकांचे स्वप्न धूसर झाले. शासनाने टीईटी उत्तीर्ण उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यातही भरती करण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. शिक्षकांच्या असंख्य जागा रिक्त असल्या तरी भरती होत नसल्याने आणि टीईटी परीक्षा द्यावी लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी डीएड् शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात खासगी व शासकीय डीएड् महाविद्यालयाची संख्या दहाच्या घरात होती; मात्र विद्यार्थीगळतीमुळे महाविद्यालयांचीही संख्या घटली आहे. सध्या कोदवली (राजापूर) व रत्नागिरीत मिळून दोन शासकीय डीएड् महाविद्यालय आहेत तर भरणे व सावर्डे येथे दोन खासगी डीएड् महाविद्यालये आहेत. या चार ठिकाणी मिळून २७० जागा आहेत. त्यात फक्त २५ टक्के जागांवरच प्रवेश झाला आहे.
चौकट
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले प्रवेश :
महाविद्यालये प्रवेशक्षमता एकूण प्रवेश
* कोदवली (राजापूर) ४० १४
* रत्नागिरी ८० १२
* भरणे १०० ३५
* सावर्डे ५० ७