महिला फसवणुकीविषयी जागृतीसाठी
रत्नागिरीत २९ रोजी मार्गदर्शन शिबिर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ः मानव तस्करीविरोधी जनजागृती महिना म्हणून जुलै महिना साजरा केला जातो. अनेक महिला व मुलींची होणारी फसवणूक, प्रेमाचे, लग्नाचे आमिष किंवा नोकरीच्या आश्वासनातून वेश्या व्यवसायात नेण्याचे प्रकार वाढलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्यायरहित जिंदगी या गोव्यातील सामाजिक संस्थेतर्फे मानसिक आरोग्यतज्ज्ञांच्या सहकार्याने २९ रोजी रत्नागिरीत सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा न्यायालय सभागृहात विशेष जनजागृती शिबिर होणार आहे.
वेश्या व्यवसायाच्यामागे बहुतेकवेळा एक संघटित गुन्हेगारी टोळी कार्यरत असते. पीडित महिलांनी अनेकदा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरीही समाजाकडून आधाराऐवजी अपमान, अवहेलना आणि दुर्लक्षच होते. अशा महिलांना छळ, आजारपण आणि अपमानास्पद आयुष्याला सामोरे जावे लागते. कोकणातील काही भागांमध्येही अशा घटनांमध्ये वाढ होत असून, हा प्रकार आता गंभीर सामाजिक संकट बनत चालला आहे.
त्यासाठी या शिबिरात मानव तस्करीची कारणमीमांसा, कायदे, पुनर्वसनाच्या योजना, मानसिक आरोग्याचे मुद्दे आणि समाजाची भूमिका या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. हे शिबिर महिला व बालकल्याण विभाग, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था, महिला संघटना, शासकीय अधिकारी तसेच संवेदनशील नागरिकांसाठी खुले आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सजग स्वास्थ्य क्लिनिक चिपळूण येथील डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.