rat18p15.jpg-
78335
रत्नागिरी ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही दख्खन येथील धनगरवाडीतील फोंडे कुटुंबीयांची मुलभूत सविधांपासून फरपट होत आहे.
--------------
दख्खनपूर्व धनगरवाडी अजून अंधारातच
सोयीसुविधांअभावी फरफट; स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवातही मूलभूत सुविधांची वानवा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : आंबाघाटातील एका दरीत वसलेली संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही अंधारातच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथे ९ कुटुंबे असलेली लोकवस्ती आहे; मात्र जागेअभावी वस्तीपर्यंत रस्ता पोहचला नाही. परिणामी, महावितरण कंपनीदेखील या वस्तीपर्यंत गेलेली नाही. त्यामुळे तेथील कुटुंबे आजही महावितरणच्या प्रकाशाच्या प्रतीक्षेत आहेत. मी हयात असेपर्यंत वीज पोहोचेल का, असा उद्विग्न सवाल येथील बनाबाई पांडुरंग फोंडे या वृद्ध महिलेने यंत्रणेला विचारला आहे.
नागरी सुविधेपासून वंचित असल्याने तात्पुरत्या स्वरूपात अनेक कुटुंबे स्वतःच घरदार, शिवार सोडून स्थलांतरित झाली आहेत; मात्र परिस्थितीअभावी इथल्याच मातीत राहणं भाग पडलेलं कुटुंब येथेच जीवन जगत आहेत. आंबाघाटातील कळकदरा स्टॉपच्या पश्चिमेला एका खोल दरीत धनगरवाडी पूर्वगावची लोकवस्ती आहे. धनगर बांधवांचा शेती आणि पशुपालन हा प्रमुख व्यवसाय असल्याने जनावरांना पुरेसा चारा मिळावा, यासाठी पूर्वजांनी या ठिकाणाची निवड केली; मात्र सध्याच्या पिढीची मुलभूत सोयीसुविधांअभावी प्रचंड फरफट होत आहे. वस्तीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी रितसर मागणी आणि ७ कुटुंबांनी वीजमीटरची २०१७ ची देयक भरणा केले. याला आठ वर्षे उलटून गेली, तरी अंमलबजावणीचा पत्ता नाही.
लोकशाहीदिनात सुद्धा या विषयावर आवाज उठवला होता. मागील वर्षी देवरूख येथे झालेल्या जनता दरबारात गावचे पोलिसपाटील रवींद्र फोंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर महावितरणची टीम घटनास्थळी भेट देऊन केवळ पाहणी करून गेली. आधुनिक युगात विजेशिवाय पर्याय नाही; मात्र या वाडीतील नवीन पिढीतील कुटुंबांना विजेअभावी घरंदारं, शेतशिवार मनाविरुद्ध सोडावं लागलं; मात्र परिस्थितीअभावी ९० वर्षांची वृद्धा, तिचा मुलगा, सून आणि तीन-सहा वर्षांखालील नातवंडे, असे ६ जण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हलाखीचे जीवन जगत आहेत. सभोवती घनदाट जंगल, बिबटे, रानरेडे, कोल्हे, कोळसुंदे अशी हिंस्र श्वापदे यांचा मुक्त वावर त्यातच रात्र पूर्ण अंधारात काढावी लागत आहे. अशा भयावह परिस्थितीशी तोंड देत एकेक दिवस पुढे ढकलणाऱ्या या कुटुंबाच्या घरी वीज कधी पोहोचणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकट...
महावितरणने मागवली माहिती
महावितरण अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन नेमकी वस्तुस्थिती काय, हे जाणून घेतो. त्यानंतर त्यावर उपाययोजना करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातमी क्र. २
विद्युतपुरवठ्यासाठी होणार १३ लाखांचे अंदाजपत्र
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडीतील दुर्लक्षित राहिलेल्या त्या नऊ कुटुंबांनी २०१४ मध्ये वीजमीटर मिळावे, यासाठी पैसे भरूनदेखील महावितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या पावत्या फोंड यांनी सादर केल्या आहेत. याची दखल नवीन कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांनी घेतली आहे. याबाबत देवरूखच्या अभियंत्यांशी चर्चा करून सुमारे चार कि.मी. जंगलामध्ये असलेल्या या धरनगरवाडीला मागेल त्याला वीज या योजनेतून विद्युतपुरवठा करण्याचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुमारे अकरा ते तेरा लाखांचे हे अंदाजपत्र होण्याची शक्यता आहे.
याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. महावितरण कंपनीकडे २०१४ ला वीजमीटरसाठी पैसे भरल्याच्या पावत्या कुटुंबीयांकडे आहेत; परंतु आजपर्यंत देवरूख येथील वायरमन व अधिकारी फक्त येऊन पाहणी करून जात होते. लवकरच आपले काम होईल, असे सांगून ते वेळ मारून नेत असल्याचे सांगितले. या गोष्टीला अकरा वर्षे होऊन सुद्धा महावितरणच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा प्रस्ताव आलेला नाही, ही एक गंभीर बाब समोर आली. तेथील ९ कुटुंबांतील ३७ लोकांना मतदान ओळखपत्र आहेत. अनेक लोकप्रतिनिधी मतदानासाठी त्यांच्याकडे जातात; परंतु या वाडीच्या नावाची नोंद संबंधित ग्रामपंचायतीत नसल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नसल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे; परंतु नवीन कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली.
त्यांनी तत्काळ देवरूख येथील अभियंत्याला याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार धनगरवाडी ही जंगलामध्ये सुमारे ४ कि.मी. अंतरावर आहे. त्यासाठी प्रत्येक कि.मी.ला १५ विद्युतखांबप्रमाणे ६० खांब टाकावे लागतील, एक रोहित्र बसवावे लागेल, लघुवाहिनी ओढावी लागेल. जंगलमय भागात विद्युतखांब नेणे कठीण आहे; परंतु मागेल त्याला वीजजोडणी ही शासनाची योजना आहे. त्यामुळे त्या योजनेतून याचे अंदाजपत्र तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. यावर लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन फुलपगारे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.