पुरवणी डोकेः
मा. विकासभाई सावंत श्रध्दांजली
swt255.jpg
79881
(कै.) विकासभाई सावंत
राजकारण, समाजकारणातला
अभेद्य चिरा निखळला
लीड
राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि अथक प्रयत्नांनी वेगळे स्थान निर्माण करणारे, शिक्षण प्रसारक मंडळाचे आधारस्तंभ विकास सावंत यांचे मंगळवारी (ता.१५) निधन झाले. त्यांनी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सिंधुदुर्गात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या रुपाने शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रातील एक अभेद्य चिरा निखळला आहे.
-----------------
मानवी जीवनाची खरी ओळख इतरांसाठी केलेल्या कार्यावर ठरते. (कै.) विकासभाई सावंत यांनी हेच तत्त्व आपल्या जीवनात अंगीकारले. त्यांची उंची, सडसडीत बांधा, डोळ्यात चमकणारे बुद्धिमत्तेचे तेज आणि चेहऱ्यावरील हसू हे सर्व त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देत होते. अभ्यासू वृत्ती, जिभेवरील गोडवा आणि असामान्य बुद्धिमत्ता या गुणांनी त्यांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकली होती. १९६३ मध्ये माजगावच्या सावंत कुटुंबात जन्मलेल्या विकासभाईंनी वडिलांच्या अकाली निधनानंतर अनपेक्षितपणे शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा सांभाळली. वयाच्या लहानपणीच अध्यक्षपद स्वीकारून तब्बल ३५ वर्षे त्यांनी संस्थेला नव्या उंचीवर नेले. शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. वित्त सभापती आणि आरोग्य सभापती म्हणून काम करताना त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले. मात्र, स्वतःच्या फायद्याचा विचार कधीच केला नाही. मराठा समाजाच्या आंदोलनात ते नेहमी आघाडीवर राहिले कारण त्यांना कायद्याचे परिपूर्ण ज्ञान होते. पैसा आणि पदाचा गर्व न करता विनम्र वाणीने त्यांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले. कार्यकर्त्यांसाठी ते एक हक्काचे स्थान होते. त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही किंवा लाचारी पत्करली नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी नेहमीच समाधानी वृत्ती जोपासली.
शिक्षण आणि राजकारणासोबतच विकासभाईंनी अर्थकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्र राज्य बँकेचे उपाध्यक्षपद भूषवून त्यांनी अनेक आर्थिक गणिते सहज सोडवली. जिल्हा बँकेवर संचालक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या सहवासात आलेल्या अनेकांना त्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचवले, जणू काही त्यांच्यातील ‘परीस स्पर्शाने’ ते ‘सोन्यात’ परिवर्तित झाले. दोडामार्ग आणि चौकुळसारख्या ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून, गोरगरीब मुलांसाठी त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्यांनी लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. पण, त्या वटवृक्षाच्या सावलीत ते नाहीत, ही खंत अनेकांना बोचत आहे. अनेक तरुणांना त्यांनी रोजगार मिळवून दिला, त्यांचे संसार मार्गी लावले. प्रशासकीय कामातील त्यांचा गाढा अनुभव अतुलनीय होता. आज जिल्ह्यात राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि दोडामार्ग येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा विकासभाईंची शाळा म्हणूनच ओळखल्या जातात.
वाचनाचा प्रचंड व्यासंग असलेले विकासभाई कोणत्याही विषयाला जटिल मानत नव्हते, त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तरे असत. त्यांच्या नावानेच त्यांच्या स्मृती जाग्या होतात आणि डोळे आपोआप पाणावतात. अनेक संकटांत ते स्थितप्रज्ञ राहिले, नियतीने अनेक परीक्षा घेतल्या, पण ते खंबीर राहिले. जीवघेण्या आजारातूनही ते उठले, पण नियतीने अखेर डाव साधलाच.
विकासभाईंच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता पोरकी झाली आहे. त्यांच्या आठवणींचा कल्लोळ दाटला आहे. कुटुंबाचे प्रमुख, साहेब, भाई, विकासकाका, मामा, आधारवड, आजोबा आणि माजगावचे हक्काचे स्थान अशा अनेक नात्यांनी ते सर्वांशी जोडले गेले होते. प्रत्येक नात्याला त्यांनी न्याय दिला. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.
आमचे आधारवड असलेले विकासभाई, तुम्ही आम्हाला सोडून अनंतात विलीन झालात. तुमच्या पवित्र स्मृतींना ही अश्रूपूर्ण शब्दांजली. तुम्ही घालून दिलेल्या आदर्श आणि केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही वाटचाल करू.
चौकट
२७ व्या वर्षापासून सांभाळली ‘शिक्षण प्रसारक’ची धुरा
सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना २२ मे १९४४ ला झाली. स्थापनेच्या दिवसापासून लोकनेते (कै.) भाईसाहेब सावंत हे शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य होते. ६ जून १९७६ ते २६ जून १९८८ पर्यंत अध्यक्ष होते. त्यानंतर २० जून १९९० ते १५ जुलै २०१५ या कालावधीत (कै.) विकासभाई सावंत हे अध्यक्ष होते. ते अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचे वय २७ वर्ष होते. शैक्षणिक संस्थेशी फारसा संबंध नसताना त्यांनी समर्थपणे शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सांभाळली, संस्थेचे नाव लौकिक वाढविला, संस्था मोठी केली.
चौकट
तीच ठरेल खरी श्रद्धांजली
अलिकडेच ८ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झालेल्या सकाळच्या ‘गौरवगाथा’मध्ये विकासभाई यांनी आपली प्रतिक्रिया देताना ‘शिक्षण प्रसारक मंडळ’चा अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व कार्यकारी मंडळाला सोबत घेऊन गेल्या काळात संस्थेची शैक्षणिक प्रगती उंचाविण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे म्हटले होते. तसेच पुढील वर्षापासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याचे संस्थेचा मानस असल्याचे सांगितले होते. त्यांची इच्छा लक्षात घेता शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संचालक आणि सभासदांना विकासभाईंचे सुपुत्र विक्रांत सावंत यांना बरोबर घेऊन त्यांच्या सर्व इच्छा पुर्ण करायच्या आहेत. विक्रांत सावंत हे उच्चशिक्षित आहेत. एमबीए, एमएमएस या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. शांती निकेतन ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या भाईसाहेब प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षांपासून कार्यकारी संचालक आहेत. त्यामुळे त्यांना शैक्षणिक संस्थाचा अनुभव आहे. (कै.) विकासभाईंचे शिक्षण प्रसारक मंडळातील स्वप्न विक्रांत सावंत यांना बरोबर घेऊन पूर्ण करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
- डॉ. दिनेश नागवेकर, उपाध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.