79893
‘ती’ वेळ सिंधुदुर्गातील ठेकेदारांवर नको
वैभव नाईक ः जिल्ह्यात तब्बल २४ कोटींची बिले थकीत
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ ः विधानसभा निवडणुकीपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या निविदा ठेकेदारांना दिल्यानंतर अनेक ठेकेदारांचे बिल अदा केलेले नाही. जिल्ह्यात १७३ ठेकेदारांची २४ कोटी ६४ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे तांदूळवाडीचे (जि.सांगली) पोट ठेकेदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली तशी आत्महत्या जिल्ह्यातील ठेकेदारांनी करू नये, असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून शासनाचा निषेध करत आहोत, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केली.
शिवसेना उद्धव ठाकरे कणकवली तालुका गटाने येथील बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फलक लावून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, जिल्हा महिला अध्यक्ष नीलम पालव, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, तात्या निकम, राजू शेट्ये, गुरुप्रसाद पेडणेकर, जयू वाळके, राजू राणे आदी उपस्थित होते. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त होता. ‘बांधकाम’च्या कार्यालयात प्रवेश न करता कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारवरच आंदोलन करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
श्री. नाईक म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये ‘हर्षल पाटील’ होऊ नये ही आमची अपेक्षा असल्याने आम्ही हे आंदोलन छेडत आहोत. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनीही आपल्या नावे कामे घेतली आहेत. अशा ग्रामपंचायतींनी सिमेंट, खडू व अन्य साहित्य पुरवठादारांकडून खरेदी केले, असे पुरवठाधारक आता पैशासाठी तगादा लावत आहेत. या सरकारकडून विविध कामांची बिले झाली नाहीत. शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे भरण्यासाठी यांच्याकडे रक्कम नाही. देवगड ते निपाणी आणि विजयदुर्ग, गगनबावडा ते कोल्हापूर हे दोन रस्ते हायब्रीड ॲनिव्हिटीमध्ये घेण्यात आले. त्या ठेकेदारांना मात्र आगावू रक्कम दिली. त्यातील काही रक्कम निवडणुकीपूर्वी याच सत्ताधारी लोकांनी बळकावली. पालकमंत्री आणि खासदार विकास झाला म्हणून सांगतात. पण, तो विकास ठेकेदारांच्या पैशातून झाला आहे. ठेकेदारांना अद्याप कोणतीही रक्कम मिळाली नाही. पर्यटनाची विविध योजनांमधून लोकांनी काही कामे केलीत. होम स्टे बांधले. मात्र, त्याला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे हर्षल पाटील या तरुणाच्या मृत्यूनंतर तरी सरकारला जाग येणार का?’’
-----------
सुमारे २५ कोटींची थकबाकी
राज्य शासनातील मंत्री हे रमी खेळण्यात दंग आहेत. महायुती सरकारमधील मंत्र्यांचा सर्वसामान्य जनतेकडे लक्ष राहिला नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी या जिल्ह्यातही अनेक नवीन कामे ठेकेदारांना वाटप केली. यामध्ये जवळपास १७३ ठेकेदारांची २४ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही बिले रेकॉर्डवर आली आहेत. अनेकांची बिले अद्याप झाली नाहीत. त्यामुळे अनेक ठेकेदार आजही बिलाची वाट पाहत आहेत, असे माजी आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.
------------
बिले मिळण्याची शाश्वती नाही ः सावंत
सार्वजनिक बांधकाममधील तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी निवृत्तीपूर्वी कोट्यवधी रुपयांची कामे इथल्या ठेकेदारांना दिली आहेत. ती कामे ठेकेदारांनी पूर्ण केली. मात्र, या कामांची बिले मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे या ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी जेव्हा जिल्ह्यात आले होते, तेव्हा त्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे जर जिल्ह्यातील ठेकेदारांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर निवृत्त झालेल्या ‘त्या’ कार्यकारी अभियंत्यांना समुपदेशनासाठी नेमावे, असे सतीश सावंत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.