79994
रेल्वेतून येणार चाकरमान्यांच्या मोटारी
गणेशोत्सवासाठी रो-रो सेवा; कोलाड ते वेर्णा दरम्यान प्रवास
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ ः कोकण रेल्वे मार्गावर यंदापासून रो-रो कार सेवा सुरू होत आहे. त्यासाठीचे बुकिंग सुरू झाले असून १३ ऑगस्टपर्यंत ते सुरू राहणार आहे. मोटारी उपलब्धतेनुसार ११ सप्टेंबरपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. कोलाड (जि.रायगड) स्थानकात रेल्वे वॅगनमध्ये मोटारी चढवल्या जाणार असून गोव्यातील वेर्णा स्थानकात त्या उतरविल्या जाणार आहेत. एका गाडीसाठी जीएसटीसह ७ हजार ८७५ रुपये भाडे असणार आहे.
कोकण रेल्वेने १९९९ पासून मोठ्या ट्रकसाठी रो-रो सेवा सुरू केली होती. त्यानंतर यंदापासून रो-रो मोटार सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत मोटारीला फ्लॅटबेड रेल्वे वॅगनवर ठेवले जाईल आणि रेल्वेमार्गे ती कोलाडहून गोव्याच्या वेर्णा स्थानकापर्यंत पोहोचवली जाईल. कारमालक स्वतः प्रवास करत असताना आपली कारही सुरक्षितपणे नेली जाईल, असा विश्वास कोकण रेल्वेने दिला आहे.
नवीन रो-रो कार सेवा २३ ऑगस्टपासून कोलाड रेल्वे स्टेशनवरून सुरू होईल तर गोव्यातील वेर्णा रेल्वे स्टेशनवरून ही ट्रेन २४ ऑगस्टपासून सुरू होईल. ही सेवा गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या गर्दीच्या काळात उपयोगी ठरेल, असा दावा कोकण रेल्वेने केला आहे. ही सेवा केवळ गणेशोत्सव कालावधीपुरतीच ११ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. रो-रो कार सेवा एक दिवसाआड दोन्ही दिशांना म्हणजे, कोलाडहून वेर्णा आणि वेर्णा येथून कोलाडला धावेल. प्रवासाच्या तीन तास आधी म्हणजेच दुपारी दोन वाजता प्रवाशांना त्यांची गाडी कोलाड स्थानकात जमा करावी लागेल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ही ट्रेन कोलाड स्टेशनवरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता वेर्णा स्टेशनला पोचेल. ही ट्रेन कोलाड आणि वेर्णा दरम्यानमध्ये कोणत्याच स्टेशनला थांबणार नाही. या सेवेसाठी एक विशेष रेल्वे तयार केली आहे. या रेल्वेत एका डब्यात २ गाड्यांप्रमाणे एकूण ४० गाड्या घेऊन जाता येतील. एका गाडीसाठी जीएसटीसह ७ हजार ८७५ रुपये भाडे आहे. तर बुकिंग करताना सुरुवातीला तुम्हाला ४ हजार रुपये आधी भरावे लागतील आणि उरलेली रक्कम प्रवासाच्या दिवशी भरता येणार आहे. रो-रो कार सेवा बुकिंगसाठी मुंबई आणि परिसरातील प्रवाशांना कोकण रेल्वेच्या बेलापूर कार्यालयात जाऊन बुकिंग करावे लागणार आहे तर परतीच्या प्रवासासाठी वेर्णा गोवा येथील कार्यालयात जाऊन तिकीट बुकिंग करावे लागणार आहे. दरम्यान, एका ट्रिपसाठी १६ पेक्षा कमी गाड्यांचं बुकिंग झाले तर ती ट्रिप रद्द केली जाऊन प्रवाशांना त्यांचे पैसे परत दिले जाणार आहेत.
-------------
प्रवाशांना विशेष डबा
या रो-रो रेल्वेतून प्रवासीही विशेष डब्यातून प्रवास करू शकणार आहेत. प्रत्येकी एका कारसोबत जास्तीत जास्त तीन प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली आहे. हे प्रवासी त्या रो-रो ट्रेनला जोडलेल्या कोचमधून प्रवास करू शकतील. यात वातानुकुलीत कोचसाठी प्रति प्रवासी ९३५ रुपये तर द्वितीय श्रेणी सिटिंगसाठी प्रति प्रवासी १९० रुपये इतके शुल्क आकारले जाईल. यामुळे कारचालक आणि त्यांच्या कुटुंबियांनाही आरामदायी प्रवास करता येणार आहे.
--------------
‘रो रो’चे नांदगाव स्थानक दुर्लक्षित
कोकण रेल्वे मार्गावर कोलाड, वेर्णा आणि सुरतकल या स्थानकांवर रो-रो सेवेसाठी विशेष प्लॅटफॉर्म आणि ट्रॅक बांधले आहेत. त्याच धर्तीवर नांदगाव (ता.कणकवली) स्थानकातही मालवाहू ट्रक चढ-उतार करण्यासाठी विशेष ट्रॅक उभारला आहे. मात्र, या ट्रॅकचा आजवर वापरच झालेला नाही. जर रो रो कार सेवेसाठी नांदगाव स्थानक उपलब्ध झाले असते तर त्याचा चाकरमान्यांना मोठा फायदा होणार होता.
---------------
कोट
रो रो कार सेवेसाठी ७ हजार ८७५ रुपये अधिक तीन प्रवाशांचे मिळून २ हजार ८०० असा १० हजार ६०० खर्च करण्यापेक्षा महामार्गावरुन मोटारीने हळूहळू गेलो तरी जाऊन-येऊन आणि गावी फिरून सुद्धा आठ हजार रुपये खर्च होत नाही. रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात रो रो स्थानक झाले तरच या सेवेचा चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे.
- रवींद्र मांजरेकर, खारेपाटण
---
दृष्टिक्षेपात
- १३ ऑगस्टपर्यंत बुकींग, ११ सप्टेंबरपर्यंत सेवा
- कोलाड-वेर्णा दरम्यान मध्ये कोणत्याच स्टेशनला थांबा नाही
- एका गाडीसाठी जीएसटीसह ७ हजार ८७५ रुपये भाडे
- बुकिंग करताना ४ हजार रुपये भरावे लागणार
- उरलेली रक्कम प्रवासाच्या दिवशी भरता येणार
- १६ पेक्षा कमी गाड्यांचं बुकिंग झाले तर फेरी रद्द, पैसे परत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.