81723
समस्यांबाबत लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट
पालकमंत्री नीतेश राणे ः कणकवलीत कोकण रेल्वे प्रवासी समितीला ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ : कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढू, अशी ग्वाही राज्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली आहे. दर तीन महिन्यांनी प्रवासी संघटना आणि पालकमंत्र्यांची संयुक्त बैठक घेऊन समस्यांचे समाधान केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कणकवली येथील ओम गणेश निवास येथे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यामध्ये जलद गाड्यांना स्थानकांवर थांबा, नवीन गाड्या, तिकीट बुकिंगच्या सुविधा, स्टेशन सुधारणा, आणि गणपती स्पेशल गाड्यांची मागणी करण्यात आली. तर राणे यांनी यासर्व समस्या रेल्वेमंत्र्यांची चर्चा करून मार्गी लावू अशी ग्वाही दिली.
कोकणात २७ ऑगस्टपासून गणेश चतुर्थी साजरी होत असून, सध्या एकही गाडी बुकिंगसाठी शिल्लक नाही. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मडूरे–दादर व सावंतवाडी–सीएसटीएम या दरम्यान दोन नव्या गाड्या तात्काळ सुरू कराव्यात आणि नंतर या गाड्या कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात, अशी समिती पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, नांदगाव, कुडाळ, झाराप, मडुरा, सावंतवाडी अशा १० स्थानकांवर १६ जलद गाड्या थांबत नाहीत. त्या गाड्यांना थांबा मिळावा, तसेच सिंधुदुर्ग स्थानकावर जनशताब्दी, नेत्रावतीसारख्या गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर, समन्वयक नंदन वेगुर्लेकर, सचिव अजय मयेकर, संतोष राणे, जयेंद्र परब, बाळा सातार्डेकर, संजय वालावलकर, किशोर जैतापकर, तेजस आंबेकर, रमेश जामसांडेकर आदी उपस्थित होते.
----
संघटनेने केलेल्या काही मागण्या
दरम्यान २५ वर्षांपूर्वी मंजूर झालेले कसाल रेल्वे स्थानक पुढील ३ महिन्यांत सुरू करावे. सर्व स्थानकांवर पीआरएस सुविधा, सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, डिजिटल बोर्ड, निवारा शेड, अॅप्रोच रोड, पार्किंग सुविधा आदी तातडीने सुरू कराव्यात. सावंतवाडी स्थानकाला ‘टर्मिनल’ म्हणून दर्जा देऊन अधिक निधी उपलब्ध करावा. मडगाव- सीएसटी मांडवी एक्स्प्रेसला नांदगाव येथे थांबा. उधना-मैंगलोर व नागपूर-मडगाव विशेष गाड्यांना सिंधुदुर्ग व कणकवली येथे थांबा. तुतारी एक्स्प्रेसचे कोच वाढवून एलएचबी रेकमध्ये बदल करावा. स्थानिक स्थानकांवर स्थानिकांना कॅन्टीन चालविण्यास मान्यता द्यावी आदी मागण्या प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.