82115
स्मार्ट मिटरला चार दिवसांची स्थगिती
महाविकास आघाडीची महावितरणवर धडक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ः स्मार्ट वीज मिटर व अनियमित पुरवठ्याच्या विषयावरून महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील महावितरण कार्यालयावर सोमवारी धडक देण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट वीज मिटर विरोधातील संपात व्यक्त करीत नवीन मिटर बसवण्यास स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यकारी अभियंता धनंजय भांबरे यांनी स्मार्ट मीटरला चार दिवसाची ताप्तुरती स्थगिती देत असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीचे नेते रमेश कदम, ठाकरे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, तालुकाध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम गुजर, सचिन शेट्ये, यशवंत फके, अजित गुजर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पदाधिकारी म्हणाले, शहरासह तालुक्यात नागरिकांची संमत्ती नसतानाही जबरदस्तीने स्मार्ट विजमीटर बसवण्यात येत आहे. ज्यांच्या घरी कोणी नाही तेथेही लॉक तोडून मिटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत. ज्या -ज्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले, तेथील ग्राहकांची वीजबिले वाढल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांवर जबरदस्तीने मीटर बसवण्यात येऊ नयेत, या प्रक्रियेला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली. शहरासह ग्रामीण भागात सातत्याने वीजपुरवठा खंडीत होतो. गेल्या चार वर्षाच्या तुलनेत वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. नियमित वीजपुरवठा होत नसल्याने विद्यार्थ्यांसह, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगधंदे, वैद्यकीय सेवा तसेच घरगुती वीज वापरावर विपरित परिणाम झाला आहे. स्मार्ट मिटर बसवण्यापूर्वी जनजागृती व नागरिकांची संमत्ती घेण्यात यावी. शहर व ग्रामीण भागात नियमित खंडीत होणार वीजपुरवठा सुरळीत करावा, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांच्या गांभीर्याने विचार न केल्यास महाविकास आघाडी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही दिला.
-----------
स्मार्ट मीटरप्रकरणी जनहित
याचिका दाखल करणार
बाळा कदम ; ठाकरे शिवसेना आक्रमक
चिपळूण, ता. ४ : मुख्यमंत्री व उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी करण्याबरोबरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेचे चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांनी दिला.
लोकांचा विरोध झुगारून तसेच जबरदस्ती करून ठेकेदार घरात स्मार्ट मीटर बसवत आहेत, याबाबत अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, आम्ही प्रथम सर्वपक्षीयांनी एकत्र येवून बैठक घेतली. केवळ चिपळूण तालुक्याचा विचार करता चार हजाराहून अधिक घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र हे बसवताना अनेक ग्राहकांना विश्वासात घेतले नाही. विशेष म्हणजे हा मीटर बसवल्यानंतर पूर्वी सरासरी ५०० रुपये येणारे वीजबिल तब्बल अडीच हजारापर्यंत पोहोचले आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात आपण स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती करणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी वीज कंपनी व संबंधित ठेकेदाराची माणसे कोणालाही विश्वासात न घेता या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवत आहेत.
केवळ आंदोलन उभारून कोणताही फायदा होणार नाही. हा प्रकार मोडीत करण्यासाठी जनहित याचिका दाखल करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी तयारी करूया. आता कोल्हापूर खंडपीठ सुरू झाले आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी जनहित याचिका दाखल करता येऊ शकते. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि पुढील निर्णय घ्यावा. आंदोलन सुरूच राहील. मात्र त्यासाठी ठोस निर्णय म्हणून जनहित याचिका दाखल करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असल्याचे कदम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.