82187
कबुलायतदार प्रश्नी लवकरच सुनावणी
दीपक केसरकर ः सावंतवाडीत ‘महाराजस्व’ अभियान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ : आंबोली, चौकुळ, गेळे गावांचा जमीन प्रश्न लवकरच सुटणार आहे. हे प्रकरण आता विभागीय कार्यालयाकडे आले असून, सुनावणी तातडीने घेतली जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर महायुती सरकारचे विशेष लक्ष आहे. राज्यातील महायुती सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
येथील तहसील कार्यालयात आयोजित महसूल सप्ताहाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे सुरू केलेल्या ‘महाराजस्व समाधान अभियान’ तसेच जुने सातबारा वितरण उपक्रमाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सहकार्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प सुरू होतील, ज्यामुळे या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास होईल.’’
यावेळी श्री. केसरकर यांनी सावंतवाडी महसूल विभागाच्या कामाचे कौतुक केले. तहसीलदार पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने लोकहिताचे काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कोकण विभागात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानित झालेल्या पाटील यांना आमदार केसरकर यांच्या हस्ते गौरविले. याच कार्यक्रमात सावंतवाडी तहसील कार्यालयातील आदर्श कर्मचारी पूनम नाईक (महसूल अधिकारी), गंगाराम शेळके (शिपाई), श्री. रणशूर (चालक) आणि तानाजी सावंत (पोलिसपाटील) यांचाही सत्कार झाला.
-------
महसूलच्या कामाचा आढावा
प्रांताधिकारी निकम, तहसीलदार पाटील यांनी महसूलच्या कामाचा आढावा घेतला. या अभियानांतर्गत जुने सात-बारा गावकऱ्यांना त्यांच्या गावातील तलाठी कार्यालयातच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १२६ प्रकरणे मंजूर केली आहेत. पुरवठा विभागाने ४०२ नवीन शिधापत्रिकांचे वाटप केले असून ५४९१ दाखल्यांचे वाटपही केल्याची माहिती त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.