82328
स्मशानभूमी दुरुस्तीसाठी रेल्वे रूळांचा वापर
ठाकरे गट ः चोरांना पाठीशी घातल्याचा आरोप; कणकवलीत रेल्वे पोलिसांना घेराओ
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ ः पिंगुळी (ता.कुडाळ) येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरूस्ती कामासाठी कोकण रेल्वेच्या रुळाचा वापर करण्यात आला. यातील दोषींवर कारवाई करण्याऐवजी रेल्वे पोलिस या चोरीतील संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. रेल्वे पोलिस ठाण्यात घेराओ घालून तेथील पोलिस निरीक्षकांना जाब विचारला. रेल्वे पोलिसांनी मात्र अशी
रेल्वे रुळांची चोरीच झाली नसल्याचे यावेळी सांगितले.
माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिस बलाच्या कार्यालयावर मोर्चा आणला. यानंतर कणकवली रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पोलिस निरीक्षक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. रेल्वे पोलिसांकडे रेल्वे रूळ चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, कोकण रेल्वेतील कर्मचाऱ्यांनीच संगनमत करून ही चोरी केली असून त्यावर पांघरूण घालण्याचे काम रेल्वे पोलिस प्रशासनाने केले, असा आरोप यावेळी माजी आमदार नाईक यांनी केला. आम्ही या प्रकाराची चौकशी केली. मात्र, तेथील स्मशानभूमीत रेल्वेचे रूळ वापरले नसल्याचे निरीक्षक सुरवाडे यांनी स्पष्ट केले.
श्री. नाईक म्हणाले, ‘कुडाळ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या पिंगुळी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेले रूळ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने एका भंगार व्यावसायिकाला देण्यात आले. त्यानंतर या रुळांचा वापर तेथील एका सार्वजनिक स्मशानभूमीसाठी करण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच रीतसर कणकवली रेल्वे पोलिसांकडे या घटनेची फिर्याद दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनातील काही अभियंत्यांनी तेथील प्रकरण मिटवून टाकले. यात रातोरात रेल्वे रूळांचा वापर करून तयार केलेले लोखंडी स्ट्रक्चर हटविले. हे स्ट्रक्चर गायब झाल्यानंतर रेल्वे पोलिस तेथे चौकशीसाठी दाखल झाले होते.’
श्री. उपरकर म्हणाले, ‘पिंगुळी येथील रेल्वे ट्रॅकच्या बाहेर काही रूळ ठेवले होते. ते त्यातील काही रूळ तेथील भंगार व्यावसायिकाने चोरले. नंतर तेच रूळ स्मशानभूमीतील चिता जाळण्याचे स्ट्रक्चर तयार करण्यासाठी वापरण्यात आले. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी आधी भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेऊन त्याची संपूर्ण चौकशी करायला हवी.’
दरम्यान, रेल्वे रूळ चोरी प्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी. रेल्वेच्या साहित्याची विनापरवाना उचल करून त्याचा वापर स्मशानभूमीसाठी करणे ही गंभीर बाब आहे. या प्रकारातील दोषींवर कारवाई न झाल्यास आठ दिवसांनी पुन्हा एकदा रेल्वे पोलिस दलाच्या कार्यालयासमोर येऊन आंदोलन करू, असा इशाराही नाईक, उपरकर यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड आदी उपस्थित होते.
-------------
रुळापासून बनविलेले स्ट्रक्चर आढळले नाही
पोलिस निरीक्षक सुरवाडे यांनी, पिंगुळी येथील रेल्वे ट्रॅक लगतचे रूळ चोरीला गेल्याची तक्रार तेथील ग्रामस्थांनी आमच्याकडे केली. त्यानंतर आम्ही कोकण रेल्वेचे वरिष्ठ शाखा अभियंता संतोष कदम यांच्यासह तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तेथे चोरी केलेले रूळ अगर त्यापासून तयार केलेले स्ट्रक्चर आढळले नाही. आम्ही या प्रकरणी आता तेथील भंगार व्यावसायिकाचीही चौकशी करणार आहोत, असे सांगितले.
--------------
‘त्या’ स्ट्रक्चरची छायाचित्रे सादर
यावेळी श्री. नाईक, श्री. उपरकर यांनी रेल्वे रूळ वापरून तयार केलेले स्मशानभूमीतील स्ट्रक्चरची छायाचित्रे दाखविली. यावेळी अभियंता कदम यांनी छायाचित्रातील स्ट्रक्चर हे रूळापासून तयार केल्याचे मान्य केले. मात्र, घटनास्थळी तशी वस्तू नसल्याचेही स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.