सावंतवाडी शहरात
आज ‘तिरंगा रॅली’
सावंतवाडी ः स्वातंत्र्य दिनानिमित्त देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी उद्या (ता. १२) शहरात भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे. येथील ऐतिहासिक संस्थानकालीन राजवाड्याच्या प्रांगणातून सकाळी १०.३० वाजता रॅलीचा प्रारंभ होणार आहे. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरणार आहे. हातात तिरंगा घेऊन, देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण करत आणि त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याची शपथ घेत ही रॅली पुढे सरकेल. शालेय विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होऊन देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. देशाला ७८ वर्षांपूर्वी मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी दिलेले योगदान याची आठवण करून देणारा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी या रॅलीत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे म्हटले आहे.
.....................
अमली पदार्थांविरोधात
वाडा प्रशालेत जागृती
देवगड ः तालुक्यातील वाडा येथील अ. कृ. केळकर हायस्कूलमध्ये ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम व विद्यार्थी समस्या मार्गदर्शन’ हा उद्बोधन कार्यक्रम प्रशालेच्या तात्या भिडे सभागृहात झाला. मुख्याध्यापिका स्मिता तेली यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर हवालदार आशिष कदम, अन्विता कदम, दर्शना देवगडकर, वाडा पोलिसपाटील तथा शालेय समिती सदस्य महेंद्र मांजरेकर उपस्थित होते. अन्विता कदम यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे फायदे-तोटे, स्वसंरक्षणासाठी करायच्या उपाययोजना, हेल्पलाईन क्रमांक, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
.......................
सावंतवाडीत उद्या
टेंबे स्वामी जयंती
सावंतवाडी ः शहरातील सबनीसवाडा येथील श्री एकमुखी दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे श्रावण वद्य षष्ठीनिमित्त बुधवारी (ता. १३) श्री टेंबे स्वामी जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वाजता एकमुखी दत्तपूजा, एकादशमी व लघुरुद्र, ९ वाजता श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी १२.३० वाजता ‘श्रीं’ची आरती, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता आरती, ७.३० वाजता श्री टेंबे स्वामी पालखी सोहळा, रात्री ८.३० वाजता भजन याप्रमाणे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व भक्तगणांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून ‘श्रीं’च्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने केले आहे.
----
‘धोकादायक झाडी
तातडीने हटवा’
आरोंदा ः मळेवाड-गुळदुवे-आरोंदा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली झाडी गणेशोत्सवापूर्वी तोडण्याची मागणी येथील ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे. मळेवाड ते आरोंदापर्यंत जाणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या या झाडीमुळे वळणावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या झाडीमुळे वळणावर समोरून येणारे वाहन अथवा जंगली प्राणी अचानक समोर आल्यास चालकांची तारांबळ उडते. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असून, या रस्त्यावरून वाहनांची रहदारी वाढणार आहे. त्यामुळे या वाढलेल्या झाडीकडे संबंधित बांधकाम विभागाने लक्ष देऊन ती गणेश चतुर्थीपूर्वी हटवावी, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.