84198
रक्षाबंधननिमित्त एसटीला पाच लाखांची ओवाळणी
रत्नागिरी विभाग; साडेचार हजार भगिनींनी केला प्रवास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : रक्षाबंधनादिवशी जादा वाहतूक व भावा-बहिणींच्या गर्दीमुळे एसटीला ४ लाख ८७ हजार ६९० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. ४ हजार ४१६ महिला, भगिनींनी या दिवशी एसटीने प्रवास केला तसेच रक्षाबंधन व त्याला जोडून आलेल्या सुट्यांमुळे चार दिवसांमध्ये एसटी महामंडळाला तब्बल १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामुळे यावर्षीचे रक्षाबंधन एसटीला पावले आहे.
महामंडळाला ११ ऑगस्ट या एकाच दिवशी ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात रत्नागिरी एसटी विभागाचे पाच लाख रुपयांचे उत्पन्न समाविष्ट आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केली.
दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी) या दिवसांत विक्रमी उत्पन्न मिळते. कारण, या दिवशी भाऊ-बहिणीकडे किंवा बहीण-भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणात होते.
परिणामी, गेली कित्येक वर्षे रक्षाबंधन सणाच्या कालावधीत एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. महिला, भगिनींनी एसटीनेच प्रवास करून भावांना राखी बांधली. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढले आहे. अशाच प्रकारे महिला, भगिनींनी प्रवासासाठी जास्तीत जास्त एसटीचा वापर करावा, असे आवाहन रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आहे. रक्षाबंधन सणानिमित्त महिला प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी आभार मानले तसेच आपल्या घरी सण असूनही कर्तव्याला प्राधान्य देत मेहनतीने काम करून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले.
-------
चौकट
रक्षाबंधननिमित्त जादा वाहतूक
आगार फेऱ्या सवलत मूल्यासह उत्पन्न प्रवासी संख्या
मंडणगड १२ ८८,०५८ ९४३
चिपळूण ६ ४१,२१६ २५२
गुहागर ४ ५,९७६ १७२
रत्नागिरी ६ ९८,९६६ २५२
लांजा ८ ५१,०२४ २४०
राजापूर २३ २,०२,४५० २५५७
विभाग ५९ ४,८७,६९० ४४१६
कोट
रक्षाबंधननिमित्त सहा तालुक्यांमध्ये मागणीनुसार जादा वाहतूक करण्यात आली होती. त्यामुळे लाडक्या बहिणी व भावांनी एसटीनेच प्रवास केल्यामुळे विभागात उत्पन्न वाढले. यात महिला भगिनींची संख्या अधिक होती. जवळपास साडेचार हजार महिलांनी त्या दिवशी प्रवास केला आहे.
- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.