महामार्गावर १९ आरोग्यपथके तैनात
गणेशोत्सवासाठी नियोजन : चाकरमानी, वाहनचालकांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर १९ आरोग्यपथके तैनात करण्यात येणार आहेत. २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान १० वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असणार आहे. त्यामुळे अपघात किंवा अन्य घटना घडल्यास चाकरमान्यांना तत्काळ मदत मिळणार आहे.
गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. कोकणात घराघरांत गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपापल्या गावी येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करतात. यामुळे महामार्गावरील वर्दळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. वाढती वाहतूक लक्षात घेता अपघातांचीही शक्यता निर्माण होते. तसेच प्रवाशांना केव्हाही वैद्यकीय गरज भासू शकते, हे लक्षात घेऊन आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आठ पथके जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत आणि उर्वरित पथके जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे तैनात करण्यात येणार आहेत.
आरोग्यपथकात दिवस-रात्र वैद्यकीय अधिकारी-१, आरोग्यसेविका-१ आरोग्य कर्मचारी-१ वाहनचालक-१ आवश्यक त्या प्राथमिक औषधोपचाराच्या साहित्यासह कार्यरत असणार आहेत. तसेच आरोग्य पथकाला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. गणेशभक्तांना वैद्यकीय सुविधेत कोणतीही कमतरता भासणार नाही, याची खबरदारी आरोग्य विभाग घेत असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप यांनी दिली.
चौकट
इथे असणार आरोग्यपथक
गुणदेफाटा, भरणेनाका, बहादूर शेख नाका, कळंबस्ते, पेढे, संगमेश्वर एसटी स्टँडजवळ, पाली, वेरळ, कुवे गणपती मंदिर येथे आरोग्यपथक तैनात राहणार आहे.
कोट
रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जिथे पोलिस तैनात असतील त्या ठिकाणी आरोग्यपथके तैनात असतील. एकूण १९ पथके बनवली आहेत. यातील काही पथके जिल्ह्याच्या अंतर्गत मार्गावर असणार आहेत.
-डॉ. भास्कर जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.