येई गणेशा.. - लोगो
swt2129.jpg
देवगड : येथील श्री गणेश मूर्तिशाळेतील कारागिरांची लगबग वाढली आहे. (छायाचित्र ः वैभव केळकर)
गणेशमूर्ती नेण्याचे नियोजन झाले सुरू
पावसाची धास्तीः मूर्तिशाळांमध्ये कामाला गती
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ः गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाच पाऊसह कमी-जास्त प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे आतापासूनच मूर्तीशाळेतून गणेशमूर्ती घरी आणण्याबाबतचे नियोजन सुरू झाले आहे. गणेशभक्त लवकर गणेशमूर्ती घरी नेण्याच्या शक्यतेने मूर्तिकारांनी कामाला अधिक गती दिली आहे.
वाढती महागाई, नैसर्गिक आपत्तींसह अनेक संकटांशी सामना करीत यंदाच्या श्री गणेशोत्सवाची चाहुल लागली आहे. बुधवारी (ता. २७) श्री गणेशाचे घरोघरी आगमन होणार असल्याने गणेश मूर्तीशाळांमधील मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. त्यातच किनारी भागात पावसाचा जोर असल्याने मूर्ती रंगवण्याची कामे रात्र जागवून करावी लागत असल्याचे चित्र आहे.
बुधवारी श्री गणेश चतुर्थी सण असला तरी, त्याआधी किमान दोन दिवस गणेशमूर्ती रंगवून तयार ठेवाव्या लागतात. अलीकडे आदल्यादिवशीच गणेशमूर्ती नेल्या जातात. पावसाचे सावट असल्याने उत्सवाआधीच पावसाचा अंदाज घेत मूर्ती घरी नेण्याची लगबग असते. आदल्या दिवशी मूर्ती नेऊन ठेवल्याने उत्सवादिवशी सकाळी वेळेवर पूजापाठ करण्यास सुलभ जाते. तसेच दूरवरच्या ठिकाणी मूर्ती नेताना आदल्या दिवशी किंवा त्याआधीही मूर्ती घरी नेल्या जातात. आकाराने मोठ्या असलेल्या गणेशमूर्ती आधीच घरी नेणे सोयीचे ठरत असल्याने त्यादृष्टीने नियोजन सुरू असते. यासाठी रविवारपर्यंत (ता.२४) मूर्ती रंगवून पूर्ण होणे अपेक्षित आहे. गेले चार दिवस किनारी भागात पावसाने जोर धरला होता. दिवसभर वादळी वाऱ्यासह जोरदार सरी बरसत होत्या. त्यामुळे गणेशमूर्ती रंगवण्यामध्ये अडचणी जाणवल्या. वातावरण कोरडे असल्यास रंगकाम केलेल्या मूर्ती वाळण्यास सुलभ जातात. अशावेळी मूर्तीचे रंगकाम करताना अधिक वेळ जातो. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असल्याने येत्या चार दिवसांत उर्वरित कामे उरकण्यावर मूर्तिकारांची धांदल आहे. महागाईमुळे माती, रंग तसेच कारागीर मजुरीत वाढ झाली आहे. त्यातच यंदा मेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. यंदा काहीसा लवकरच उत्सव आला आहे. त्यामुळे आता गणेश चित्रशाळांमधील लगबग अखेरच्या टप्प्यात आहे.
चौकट
मुले, महिलांचाही कामात हातभार
मूर्तिशाळांमध्ये रात्र जागवून तसेच रंगकामासाठी माणसे वाढवून काम करण्यावर भर आहे. मूर्तीचे रंगकाम करण्यासाठी घरातील मंडळीही सहभागी असल्याचे चित्र आहे. यामध्ये मुले तसेच महिलाही मदत करीत असल्याचे मूर्तिकार सांगतात. उत्सव तोंडावर आल्याने सर्वच पातळीवरील धांदल वाढली आहे. ‘रात्र थोडी, सोंगे फार’ अशी सध्या अवस्था असल्याने एकूणच धांदल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.