86153
86154
वैभववाडी विकास आराखड्यावरून खडाजंगी
नागरिकांनी पदाधिकाऱ्यांना धरले जबाबदार; पालकमंत्र्यांना भेटण्यावर मात्र एकमत
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २१ः शहराच्या विकास आराखड्यावरून नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. नागरिकांनी पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. अखेर पालकमंत्री नीतेश राणे यांची भेट घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत सर्वांचे एकमत झाले.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांनी विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी येथील आंबेडकर भवनात सभा आयोजित केली होती. या सभेला नगराध्यक्ष श्रध्दा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, बांधकाम सभापती रणजित तावडे, जयेंद्र रावराणे, शांताराम रावराणे, अशोक रावराणे, सज्जन रावराणे आदी उपस्थित होते.
वैभववाडी शहराच्या विकास आराखड्यासंदर्भात माहिती देतानाच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शांताराम रावराणे यांनी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. या बैठकीला अधिकारी नसतील तर प्रश्नांची सोडवणूक कोणाकडून करून घ्यायची, असा प्रश्न उपस्थित करत, हा आराखडा नगरपंचायत पदाधिकाऱ्यांची चूक आहे. त्यांनीच ती सुधारून द्यावी, अशी मागणी केली.
श्री. रावराणे यांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असताना अशोक रावराणे यांनी पदाधिकाऱ्यांवर आगपाखड करण्यास सुरुवात केली. कुणालाही विश्वासात न घेता नगरपंचायतीने हा आराखडा तयार केला आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष रावराणे आणि बांधकाम सभापती तावडे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. हा आराखड बनविताना गोपनीयता पाळण्यात आली होती. आम्हाला देखील त्याची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे हा प्रकार झालेला आहे; परंतु हरकती घेऊन हा प्रश्न सोडविता येईल. त्याकरिताच आजची बैठक बोलविण्यात आलेली आहे, असे सांगितले.
यावेळी जयेंद्र रावराणे यांनी विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्री राणे यांची भेट घेऊया. त्यांच्या निदर्शनास सर्व गोष्टी आणून दिल्यानंतर ते यातून मार्ग काढतील, असे सांगीतले. त्यावर सर्वांचे एकमत झाले. या सभेनंतर सर्व नागरिकांनी बाजारपेठेतून आराखड्याला विरोध रॅली काढत नगरपंचायतीमध्ये जाऊन विरोधाबाबतचे निवेदन दिले.
चौकट
सभेतील गोंधळामुळे संभ्रमाचे वातावरण
आराखड्यावरून पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये चर्चा सुरू असताना जोरदार शाब्दिक खटके उडाले. त्यानंतर अनेक नागरिक एकाच वेळी जोरजोरात बोलू लागले. त्यामुळे सभेत मोठा गोंधळ निर्माण झाला. काही वेळ उपस्थित नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.