86175
रस्ता दुरवस्थेवरून भाजप आक्रमक
अधिकाऱ्यांचा उपरोधिक सत्कार; झाडी तोडत खड्डे बुजवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग. ता. २१ : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावरील झाडी तोडण्याकडे व खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजपचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व कार्यकर्त्यांनी आज बांधकाम कार्यालयात धडक दिली. उपकार्यकारी अभियंता संभाजी घंटे यांचा उपरोधिक सत्कार केला. त्यांच्या सहकाऱ्यांकडे श्रीफळ देऊन घंटे यांच्याकडे सुपूर्द करत चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील झाडी साफ करण्याची मागणी केली.
तालुक्यातील रस्त्यावरील झाडी वाढली आहे. तसेच काही ठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास जाणवत आहे. चतुर्थी सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असून अद्यापही रस्त्यावरची झाडी तोडून साफसफाई केली नाही. काही ठिकाणी पडलेले खड्डे देखील बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. चतुर्थी सणात येणाऱ्या चाकरमान्यांना तसेच वाहतूकदारांना त्रास होणार, याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप कार्यकर्ते नाडकर्णी, माजी भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, कळणे सरपंच अजित देसाई, संजय विरनोडकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागावर धडक दिली. बांधकाम विभागाच्या अभियंता सीमा गोवेकर यांची भेट घेऊन बांधकामच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. शाखा अभियंता यांच्या कामकाजावर संताप व्यक्त केला. सांगितलेली कामे वेळेत होत नसून कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे शाखा अभियंता यांचा श्रीफळ देऊन सत्कार करणार असल्याचे सांगताच घंटे यांची तब्येत ठीक नसल्याने ते सध्या सुटीवर आहेत, असे सांगण्यात आले. यावर भाजप कार्यकर्त्यांनी, ते नसले तरी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवा, त्यांच्याकडे श्रीफळ देऊ, असे सांगत घंटे यांच्या सत्कारासाठी आणलेला श्रीफळ कर्मचाऱ्यांकडे देऊन घंटे त्यांच्यापर्यंत पोचविण्यास सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.