जपूया बीज वारसा---------लोगो
(१९ ऑगस्ट टुडे ३)
रासायनिक शेती आणि संकरित बियाणे वापरून शेती होत असताना या सणवारांमध्ये असलेल्या विविध सांस्कृतिक परंपरा पाळण्यासाठी स्थानिक जैवविविधता जपली जाते. नैवेद्यामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ वापरले जातात, ते आपल्या खाद्यसंस्कृतीचे मानक असतात. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी का होईना; पण हरिक, धनेसाळसारखी धान्ये लावली जातात. उपवास सोडण्यासाठी किंवा प्रसाद म्हणून जे पदार्थ खाल्ले जातात त्या निमित्ताने आपली खाद्यसंस्कृती जपली जाते.
- rat२५p६.jpg-
P२५N८६९१३
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टिज्ञान संस्था
-----
सांस्कृतिक चालीरीती अन्
आदिम बियाणी
पावसाळा सुरू झाला की, शेतीच्या कामांची जशी लगबग सुरू होते त्याचप्रमाणे विविध सणवारदेखील सुरू होतात. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक या चातुर्मासात विविध महत्त्वाचे सण साजरे केले जातात. या कालावधीत आषाढ तळणे, धोंड्याचा महिना, आषाढी एकादशी, दीपपूजन, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पिठोरी अमावस्या, पोळा, हरितालिका, गणपती-गौरी, पितृपक्ष, नवरात्र, दसरा, नवान्न पौर्णिमा, दिवाळी यांसारखे सण येतात. यामध्ये नैवेद्य काय असावा, देवाला वाहायच्या तसेच सजावटीच्या गोष्टी याबाबत स्थानिक पातळीवर विविध संस्कृतींच्या चालीरीती पाळल्या जातात. त्या पूर्ण करण्यासाठी विशिष्ट वनस्पती, अन्नधान्य यांची आवर्जून लागवड केली जाते. या माध्यमातून आदिम बियाणांमधील जैवविविधता टिकून राहायला मदत होते. या कालावधीत विविध उपवासदेखील केले जातात. कोकण भागात उपवास सोडण्यासाठी विशिष्ट भाज्यांचा उपयोग केला जातो. जसे की, श्रावणी सोमवारचा उपवास सोडायला कवळा आणि श्रावणी शनिवारचा उपवास सोडायला कुरडूची भाजी यांसारख्या रानभाज्या वापरल्या जातात.
गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पानांची भाजी आणि आंबोळी, नागपंचमीसाठी खास तयार केलेल्या विविध धान्यांच्या लाह्या, पिठोरी अमावास्येला केली जाणारी तांदळाची खीर, गोकुळाष्टमीच्या प्रसादात पोहे-काकडी-चिबूड यांचा ''काला'', पोळ्याच्या निमित्ताने गाई-बैलांसाठी केली जाणारी पुरणपोळी, हरितालिकेच्या पूजेमध्ये वापरली जाणारी पत्री, गणपतीच्या सजावटीसाठी बांधली जाणारी माटोळी, ऋषी पंचमीला केली जाणारी मिश्र भाजी, बैलांच्या पायाखालचे खायचे नाही म्हणून केलेली वरीची भाकरी, ‘दोरे सोडणे’ या रितीसाठी खास दिवे बनवण्यासाठी वापरला जाणारा धनेसाळ भात, भाताच्या नवीन दाण्यांचे महत्त्व सांगणारी नवान्न पौर्णिमा, देवीला नैवेद्यासाठी केलेला हरिकाचा भात, दसऱ्याला शमी आणि आपट्याच्या पानांचे महत्त्व, खरीप पिकांचे भरघोस उत्पादन साजरे करणारी दिवाळी आणि पहिल्या आंघोळीला चिरडलेली कारेटी अशा अनेक सणांमध्ये स्थानिक अन्नधान्य, पाने, फुले, फळे यांचा वापर केला जातो. जेव्हा स्थानिक शेतीमधील जैवविविधता कमी होते तेव्हा त्याचा थेट परिणाम शेतीवर आणि लोकांच्या सामाजिक आयुष्यावर होत असतो. नवान्न पौर्णिमा हा विविध ताज्या तांदळांच्या चवांचा एक पारंपरिक आणि अद्वितीय महोत्सव आहे; मात्र, सध्या आपण सगळे एकाच प्रकारचे संकरित बियाणे वापरत असल्यामुळे या सणाचे महत्त्व कमी झाले आहे आणि बरेच शेतकरी आता हा सण साजरा करत नाहीत.
कोकणात असलेली देवराई या पारंपरिक संरक्षित जंगलांमुळे मूळ नैसर्गिक पर्यावरणाचे जतन केले जाते. म्हणूनच या देवरायांमध्ये अनेक वन्य पिकांच्या जाती आढळतात. परिसंस्थेतील प्रमुख प्रजातींची प्राचीन झाडे काळजीपूर्वक जतन केली जातात. त्यामुळे स्थानिक परिसंस्था आणि स्थानिक पीक प्रजातीदेखील संरक्षित केल्या जातात. या व्यतिरिक्त, काही पारंपरिक भाताच्या जातींचा पेंढा पशुधनाला चारा देण्यासाठी, घरे बांधण्यासाठी, कौले शाकारण्यासाठी, झाडू बनवण्यासाठी आणि इतर उपयोगांसाठी वापरला जातो. हे उपयोग पारंपरिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, जे पारंपरिक संस्कृतीद्वारे संरक्षित केले जातात. हजारो वर्षांपासून शेतकऱ्यांनी पारंपरिक भाताच्या जातींचे जतन केले आहे, हे त्यांच्या सातत्यपूर्ण वापराचे फलित आहे.
हेच लक्षात घेऊन, २००२ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण कृषीवारसा प्रणाली (Globally Important Agricultural Heritage Systems) नावाचा एक जागतिक पारंपरिक कृषी संरक्षण उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पारंपरिक कृषी प्रणालींना त्यांच्या स्थानिक महत्त्वपूर्ण मूल्यांसह संरक्षित करणे आहे. कोकणातील वनसंपदा, देवराया आणि या जैवविविधतेशी जोडलेल्या सणवार व त्यांच्या चालीरीती पाहता हा एक मोठा सांस्कृतिक वारसा जपला जात आहे, हे निश्चित!
(लेखक स्वतः शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.