87293
धामापूर तलावात मूर्ती विसर्जनास बंदी
तहसीलदार वर्षा झालटेः हरीत लवादाच्या आदेशानुसार निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ ः हरीत लवादाच्या आदेशानुसार तालुक्यातील ऐतिहासिक धामापूर तलावात मूर्ती विसर्जन करणे, तलावाच्या पाण्यामध्ये कपडे-भांडी धुणे तसेच तलावात आंघोळ करणे यावर कायमस्वरूपी मनाई आदेश निर्गमीत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार वर्षा झालटे यांनी दिली आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
धामापूर तलावाला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि ५०० वर्षे जुन्या कार्यक्षम जल व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन आणि जलसिंचन आयोगाने (ICID) जागतिक वारसा जल व्यवस्थापन स्थळ (WHIS) पुरस्कार प्रदान केला आहे. धामापूर तलावतर्फे मालवण शहर आणि धामापूर, काळसे, कुंभारमाठ गावांना पिण्याचे पाणी पुरवठ्यासह अनेक पर्यावरणीय सेवा प्रदान केली जाते. यात काळसे आणि धामापूरच्या शेतकऱ्यांसाठी सिंचन, गोड्या पाण्यातील माशांची पैदास, भूजल पुनर्भरण, सभोवतालच्या वन परिसंस्थेला आधार, पुराला प्रतिबंध आणि पर्यावरणाभिमुख पर्यटन यांचा समावेश आहे. हरित न्यायाधिकरण पुणे यांनी धामापूर तलावात मूर्ती विसर्जन, कपडे-भांडी धुणे यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरुन तलावाची पर्यावरणीय अखंडता जपता येईल. तसेच मूर्तीमध्ये धातूच्या पिन, प्लास्टिक आणि काचेसह रासायनिक रंग आणि जैवविघटन न होणारे सजावटीचे साहित्य वापरले जाते. यामुळे या तलावात गाळ साचणे, पाणी धारण क्षमता कमी होणे, जलचरात अडथळा, युट्रोफिकेशन आणि जलचरांना नुकसान होते. त्यामुळे कार्यकारी दंडाधिकारी वर्षा झालटे यांनी नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन २७ ऑगस्टपासून ग्रामपंचायत धामापूर येथील धामापूर तलाव येथे कायम स्वरूपी मनाई आदेश जारी केले आहेत. यात २७ पासून धामापूर तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. धामापूर तलावाच्या पाण्यामध्ये कपडे-भांडी धुणे तसेच तलावात आंघोळ करणे, तलावाच्या पाण्यामध्ये अस्थी विसर्जन करणे किंवा अन्य कोणत्याही वस्तूंचे विसर्जन करणे, तलावाच्या पाण्यामध्ये सांडपाणी किंवा अन्य कोणताही द्रव पदार्थ तलावाच्या जलस्रोतात सोडण्यास बंदी घालण्यात येत आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा धामापूर तलावाच्या व त्याच्या परिसरातील जैवविविधतेला कोणत्याही प्रकारे प्रदूषण किंवा हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या आदेशाची अंमलबजावणी ही पोलीस विभाग, महसुल विभाग, मालवण पालिका, धामापुर ग्रामपंचायत, जलसंपदा विभाग हे करतील, असे तहसीलदारांच्या आदेशात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.