-rat२६p४४.jpg-
P२५N८७३०६
चिपळूण : तालुक्यातील कामथे या ठिकाणी मुंबईतून येणाऱ्या वाहनांची महामार्गावर गर्दी झाली होती. (मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा)
------------
महामार्गासह रेल्वेप्रवासात अडथळ्यांची शर्यत
वेळापत्रक कोलमडले : महामार्गावर वाहतूककोंडी, दहा ते पंधरा तासांचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली असून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे या दोन्ही मार्गांनी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्यामुळे वेळापत्रकावर परिणाम झाला असून, महामार्गावर ठिकठिकाणी होत असलेल्या कोंडीमुळे प्रवास दहा ते पंधरा तास विलंबाने होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. चौपदरीकरणामुळे प्रवासात काहीसा वेग आला असला तरी, क्रॉसिंग, जोडरस्ते आणि अपूर्ण उड्डाणपुलांच्या कामांमुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर जाणवते. शनिवारपासून सुरू झालेली चाकरमान्यांची गर्दी मंगळवारीही कायम आहे. अनेकांनी झालेल्या कामातील प्रगतीचे कौतुक करत उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. २०११ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प पळस्पे (पनवेल) ते झाराप (गोवा सीमेपर्यंत) पसरलेला आहे. ४ लेनचा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यास सध्या १२ तासांचा असलेला प्रवास केवळ ६ तासांत पार करता येणार आहे.
चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी या ठिकाणी काम अजूनही सुरू असून, काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आणि अपुरी सुरक्षाव्यवस्था जाणवते. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेने २२ ऑगस्टपासून ३८० विशेष गाड्या चालवल्या आहेत; मात्र, या गर्दीचा परिणाम वेळापत्रकावर झाला आहे. अनेक गाड्या मेंगलोर एक्स्प्रेस, कोकण कन्या, तुतारी, जनशताब्दी या २ ते ३ तास उशिराने धावत आहेत. मांडवी एक्सप्रेससारख्या नियमित गाड्यांनाही उशीर होत आहे. परिणामी, मुंबई, ठाणे, पनवेलसह विविध स्थानकांवर प्रवासी ताटकळत उभे आहेत.
चौकट
विलंबाची कारणे
* एकाच वेळी अनेक विशेष गाड्या सुरू केल्याने ट्रॅकवर ताण
* नियोजनातील त्रुटी आणि अपुरी माहिती
* गर्दीमुळे काही प्रवासी २४ तास आधीच स्थानकांवर.
* रेल्वे प्रवास त्रासदायक, वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची अडचण
-----
कोट
मी चारचाकीने मुंबईहून चिपळूण प्रवास केला. चौपदरीकरणामुळे वेळ वाचला; पण अनेक ठिकाणी रस्ता खराब आहे. दरडी कोसळण्याचा धोका, अंधारात दिशादर्शक फलकांची अचूकता नाही आणि प्राथमिक सुविधांचा अभाव दिसतो. केवळ सिमेंट रस्ता पुरेसा नाही, सुरक्षेची व्यवस्था आवश्यक आहे.
- विशाल घोरपडे, पेढे, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.