बोल बळीराजाचे-------लोगो
(२३ ऑगस्ट टुडे ३)
कोकणातल्या माझ्या बळीराजासमोरच्या अनेक समस्यांतील अगदी रोजची समस्या म्हणाल तर कामाला माणूस न मिळणं.. थोडं आश्चर्य वाटत असेल ना की, जगातली सर्वात मोठी लोकसंख्या, सर्वात तरुण देश; पण कामाला माणूस नाही?..दुसरं आश्चर्य असं की, याच कोकणातला सर्वसामान्य माणूस शहरात पळतोय. कारण, हाताला काम नाही.. केवढे विसंगतीपूर्ण चित्र? गेल्या दहा वर्षांत पायाभूत सुविधांवर जे मजूर काम करतायंत त्यातले एक टक्काही लोक कोकणातील नाहीत. कोकणातील मुलभूत उद्योग, शेती, बागायती, मासेमारी यात काम करणारे दहा टक्के तरी मजूर कोकणातील आहेत का? हा संशोधनाचा विषय..शेतीपूरक उद्योग, बांधकामपूरक उद्योग, खाण व्यवसाय, कात व्यवसाय, मेकॅनिक-इलेक्ट्रिशियन.. कशा कशात कोकणी माणूस नाही.. मग बेकारी आहे कुठे?
- rat२९p१.jpg-
25N87862
- जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
---
कामाला माणसं मिळतील,
गडीपैरी नव्हे सहकारी....!
कोकणातील सध्याच्या समस्येचे मूळ शिक्षणव्यवस्थेत, राजकीय व्यवस्थेत, समाजव्यवस्थेत दडलंय. आपण शिकलोय; पण सुशिक्षित झालो नाही. कामाच्या दर्जाबाबत भ्रामक कल्पना आपल्या डोक्यात भरल्यात. आपण यशाला शॉर्टकट शोधतोय आणि पैशाच्या दिखाव्याला संपन्नता समजतोय. सूज आणि सौष्ठव यातलं अंतर दुर्लक्षित करतोय. ही दोन चार पिढ्यांची फसवणूक कोकणची संस्कृती, संपन्नता, आत्मनिर्भरता संपवतेयं. ‘इथं राहण्यात काही भविष्य उरलं नाही,’ हा फेक नॅरेटिव्ह कोकण संपवायला निघालाय.. माझ्या बळीराजाच्या अस्तित्वावरच उठलाय. फुकट वाटपाचे लांगुलचालन, सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे चक्र, कामाची निर्माण झालेली लाज आणि सर्वात चिंताजनक म्हणजे ‘आता हे असंच चालायचं,’ ही स्वीकारार्हता शेतकऱ्याच्या जगण्याला अस्वस्थ करतेय. बदलता निसर्ग, ग्लोबल वॉर्मिंग यांनी म्हणे माणसाचं अस्तित्व धोक्यात आहे. इथे कोकण तर मजूर समस्येनं लयाला जाताना माझा बळीराजा रोज अनुभवतोय.
थोडं दुसऱ्या बाजूने बघूया. कुळवहिवाट कायद्यानं ‘कसेल त्याची जमीन’ या न्यायानं जमीनदारकीचं विकेंद्रीकरण केलं. आपली शेती आपण कसण्यात काही वर्ष गेली आणि आता या जमिनी लाखो रुपये गुंठ्यांच्या दरानं सर्रास विकल्या जातायंत. फुकटच्या मायाजाळात पिकवायची कोणाला गरज वाटत नाहीशी झालीय. हे मृगजळ तत्कालिक आहे, हे आपण शेतकरीच विसरून गेलोय. कसायला मिळालेली जमीनच जर आपण गमावून बसलो तर खरंच जेव्हा हा बुडबुडा फुटेल तेव्हा काय? या जगात फुकट कधीच कोणाला काही मिळत नाही. हा काळ संक्रमणाचा आहे. यात दोन तीन-पिढ्या जातीलही...; पण लांब नाही. अगदी दहा-पंधरा वर्षांनी बैल असले तरी जोत बांधता येईल! इसाड जोखडाच्या खाली की, वर हे आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवलाय नांगराचं फालेटू मारणारा सुतार पुढच्या पिढीत आहे. शिऱ्यांचा चेप, चेप आणून वय, निवडूंग मोखा..चार तळाटून कापून बांधलेला पेंढा..काय.. काय येतंय बळीराजाला? गुणसुत्र विकास पिढ्यानपिढ्या होतो तेव्हाच जात्यावर ओवी सुचते.. प्रत्येक पिढीत नवी विटी नवा दांडू असेल तर ‘रक्तातच ते राहिलं नाही’ असंच होणार ना..! म्हणून उलटी गंगा वहावी असं बिलकूल नाही; पण नदीनं मूळ-ऋषीनं कुळ विसरलं तर लक्ष्यापर्यंत पोहचेपर्यंत (खरंच, असं काही लक्ष्य असलं तर) आपण भूत-वर्तमान विसरलो तर भविष्यही निरर्थक होऊन जाईल.
वारंगुळ्यानं शेती हा सहकारच होता ना.. अजूनही सुपाऱ्यांचे बागायतदार एकमेकांकडे सुपारी सोलायला जातात ना.. नाचणीच्या मळण्या बदली गड्यात होतात ना.. गवत काढायला आपापसात मजुरी नाहीच ना.. मग सहकाराचा एवढा गवगवा कशाला? वाढतं यांत्रिकीकरण अनेक कामं सोपी करतंय. सुशिक्षित पिढी कंत्राटी पद्धतीनं अनेक कामं यंत्राच्या सहाय्यानं करतंय. जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर असतंच. आपण मोकळ्या मनानं स्वीकारायला हवं. दुचाकीवर पॅंट घालून येणारा कामगार आणि टॉवेल गुंडाळून आकडीकोयतीवाला गडी यातला काळाचा महिमा बळीराजानं स्वीकारायला हवा. समानता शाळेतल्या प्रतिज्ञेतून व्यवहारातल्या जीवनचक्रात मुरायला हवी. आता कामाला माणसं मिळणारच नाहीत.. माणसांना कामं आपलं वाटायला हवं. राहणीमानाचा बदलता दर्जा, वेळेचं गणित, पैशाचं अवमूल्यन हे शब्द जगता आले तर गडीपैरी नव्हे तर सहकारी तयार होतील. संक्रमणाच्या काळाचं हेच तर वैशिष्ट्य असतं ना.. काळ बदलतो तेव्हा माझा बळीराजा काळानुसार बदलून परिपक्व झालेला हवा. जोपर्यंत पोट आहे तोपर्यंत शेतीला पर्याय नाहीच.. कितीही पूर आले तरी माझा बळीराजा वाहवत नाही. उद्याच्या लख्ख उन्हाची खात्री त्याला अनेक पिढ्यांनी दिलीय. फक्त धीर हवा.. परमेश्वराचा क्षणही आपल्या काही शतकांचा असतो म्हणे.. माझा बळीराजा तोपर्यंत नक्की टिकणार..!!
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.