swt2913.jpg
N87998
कोकिसरेः येथील भुयारी मार्गाचे काम पुर्ण झाले आहे.
भुयारी मार्ग झाला पण जोडरस्त्याचे काय?
कोकिसरेतील संघर्ष संपेना; आणखी किती वर्षे ‘फाटक’ समस्या?
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २८ः एक दोन नव्हे तर १६ वर्षांच्या संघर्षानंतर कोकिसरे रेल्वे फाटकाला पर्यायी भुयारी मार्ग पूर्ण झाला; परंतु जोडरस्त्याचे भूसंपादन न झाल्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. त्यामुळे येथील वाहनचालकांना अजून किती वर्षे रेल्वे फाटकाच्या समस्येला सामोरे जावे लागणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
विजयदुर्ग-कोल्हापूर हा जिल्ह्यातील सर्व राज्यमार्गांपेक्षा सर्वाधिक वाहतूक असलेला राज्यमार्ग होता. त्यामुळे ज्यावेळी कोकण रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले, त्यावेळी कोकिसरे येथे भुयारी मार्ग तयार करणे अपेक्षित होते; परंतु तालुकावासीय कोकण रेल्वे येतेय या आनंदात सर्व भान विसरून गेले. काही वर्षांत कोकण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले आणि गाड्या धावू लागल्या. सुरुवातीला काही मोजक्याच गाड्या या रेल्वेमार्गावर धावत असल्याने कोकिसरे रेल्वे फाटक ही समस्या वाटलीच नाही; परंतु त्यानंतर या मार्गावरून ३० ते ३५ गाड्या धावू लागल्या आणि रेल्वे फाटक हे डोकेदुखी ठरू लागले, तरीही कुणी उठाव केला नाही. अखेर २००८ च्या सुमारास भाजपाचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी रेल्वे फाटकाला पर्याय निर्माण करावा, या मागणीसाठी पहिले आंदोलन छेडले. त्यानंतर त्यांनी सतत पाठपुरावा सुरू केला.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडुन आले. त्यानंतर त्यांनी आमदार म्हणून कोकण रेल्वे प्रशासन, केंद्रीय रेल्वेमंत्री, जिल्हा नियोजन यांच्याकडे सातत्याने प्रयत्न केले; परंतु विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे यश आले नाही. २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर नव्या जोमाने त्यांनी तो विषय पुन्हा हाती घेतला. श्री. जठार यांचा प्रयत्न सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानतंर ते राज्यसभेचे खासदार झाले. त्यामुळे या कामाला गती मिळाली. भुयारी मार्गासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला व भुयारी मार्गाचे सर्वेक्षण झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कोकण रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक झाली आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली.
भुयारी मार्गाचे काम यावर्षी मेमध्ये पूर्ण झाले. त्यामुळे १६ वर्षांच्या संघर्षाला एका अर्थी पूर्णविराम मिळाला; परंतु तरी देखील हा संघर्ष संपला, असे म्हणता येणार नाही. या भुयारी मार्गाच्या भूसंपादनाचे काम रेंगाळले आहे. या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने भुयारी मार्ग सुरू होण्याची तूर्तास कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. त्यामुळे आणखी किती वर्षे रेल्वे फाटकाच्या समस्येला सामोरे लागणार, असा प्रश्न आता वाहनचालकांतून विचारला जात आहे.
कोट
भुयारी मार्गाला जोडरस्ता आवश्यक आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून आम्ही हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. भूसंपादनाची प्रकिया सुरू आहे. काही अडचणी निर्माण झाल्या; परंतु त्या दूर करण्याचे काम सुरू आहे. लवकरात लवकर जोडरस्त्याचे काम करून भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- सुधीर नकाशे, तालुकाध्यक्ष, भाजपा, वैभववाडी.
चौकट
एक नजर
*तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटक.
* या मार्गावरून प्रतिदिन ३२ हजार मेट्रीक टन वाहतूक.
* रेल्वेफाटकामुळे २४ पैकी १४ तास हा मार्ग बंद होतो.
* आपत्कालीन परिस्थतीत फाटकामुळे अनेक अडचणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.