swt303.jpg
88165
शैलजा पांढरे
swt304.jpg
88166
शैलजा पांढरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आजगावच्या शैलजाची संघर्ष गाथा
दिव्यांगत्वाशी दोन हात : लेखनातून मिळविली स्वतंत्र ओळख
मदन मुरकर : सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ३०ः आयुष्याला वळण देण्यासाठी तिने खूप स्वप्ने पाहिली. नशिबाने मात्र अचानक दिव्यांगत्व पदरी पाडले; पण ती थांबली नाही. परिस्थितीशी दोन हात करतच राहिली. चांगले शिक्षण घेतले. आता ती या सगळ्यावर मात करत लेखन आणि साहित्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. आजगाव येथील शैलजा पांढरेची ही संघर्ष गाथा प्रेरणादायी म्हणावी लागेल.
शिरोडा येथील बा. म. गोगटे महाविद्यालयातील कला शाखेतून तिने बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईत मामाकडे गेली. बारावीनंतर पुढचे शिक्षण पूर्ण करून तिला तिच्या बाबांसारखं शिक्षक व्हायचे होते; पण नियतीला ते मान्य नव्हते. कारण, ‘मनांत येते हत्ती, घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात याला पायी चालवावे’, या पंक्तीचा प्रत्यय तिला त्यावेळी आला.
मुंबईत गेल्यावर दुसऱ्याच दिवशी दुर्दैवाने शौचालयाच्या पायऱ्यांवरून घसरून पडली. त्यामुळे पुढे तिला शारीरिक त्रास सुरू झाला. तिथे छोटे-छोटे उपचार केले; पण हवा तसा फरक पडला नाही. काही दिवसांनी ती गावी आली. गावी आल्यावर देखील उपचार केले; पण दुखणे चालूच राहिले.
यथावकाश बारावीचा निकाल लागला. नेहमी वर्गात व्दितीय येणारी शैलजा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. हिंदी आणि समाजशास्त्र या पेपरदरम्यानच्या बस गैरसोयीमुळे परीक्षा केंद्रावर पोहाेचायला उशीर झाला होता; त्यामुळे ती गोंधळून गेली होती. परिणामी गुण कमी मिळाल्याने तिचा नंबर हुकला. गुणपत्रक आणायला जड अंतःकरणाने ती कॉलेजमध्ये गेली, तेव्हा नाराज होऊनच इंग्रजी विषयाचे प्रा. कौलापुरे यांना भेटली. त्यांनी सांगितले की, ‘जीवनात कधी ना कधी आपलं आपल्याला मिळतं’. त्यांच्या या वाक्याने तिचे मनोबल वाढले.
दुर्दैवाने आलेल्या त्या शारीरिक आजारपणामुळे पुढे दैनंदिन कॉलेजसाठी प्रवास करणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी अभ्यास केंद्रात कला शाखेत प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. तिथे बहिस्थ अभ्यासक्रम पूर्ण करतेवेळी शिरोडा येथे कॉम्प्युटर, टायपिंग, शिवणकला आणि ‘सॉफ्ट टॉईज’ असे कोर्स पूर्ण केले. पुढे तीन वर्षांनी तृतीय वर्षाची परीक्षा दिली. त्यात ती अर्थशास्त्र विषयात जिल्ह्यात प्रथम आली. त्यावेळी तिला प्रा. कौलापुरे यांच्या ‘त्या’ विधानाची प्रकर्षाने आठवण झाली.
या यशामुळे पुढील शिक्षणाची इच्छा दुणावली. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून वडिलांच्या साहाय्याने अर्थशास्त्र व मराठी या दोन विषयांत ‘एम. ए.’ पूर्ण केले. तेथील परीक्षा केंद्रावर गेल्यावर वडील आसन क्रमांक शोधायचे. वडिलांची साथ असल्यामुळेच तिला शिक्षणाची ओढ कायम होती. त्या दरम्यान परीक्षा वर्गात जाण्यासाठी बऱ्याच वेळेला आसन क्रमांकापर्यंत जिने चढून जावे लागायचे. फार त्रास व्हायचा; पण वडिलांच्या साहाय्याने ती कशीबशी जिने चढायची. त्यावेळी तिची अवस्था बघून तिथल्याच एका शिक्षकांनी तिला अपंग प्रमाणपत्राबद्दल सूचित केले. गावी आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात जाऊन दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केले आणि ४० टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले.
शिक्षण तर पूर्ण झाले होते; पण शिक्षणाला प्रशिक्षणाची जोड हवी, तरच शिक्षिका होऊ शकते, हे विदित होते. बी.एड्. करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. मग कुडाळ येथील बॅ. नाथ पै महिला अध्यापक महाविद्यालयात बी.एड्.साठी प्रवेश घेण्यासाठी गेली. तिची जिद्द बघून संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी तिला मोलाचे सहकार्य केले. सीईटी परीक्षेनंतर प्रवेश निश्चित होताच गाळवणकर यांनी शैलजासाठी वर्गाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग तोडून रॅम्पची सुविधा उपलब्ध करून दिली. कॉलेज परिसरातच खोली घेऊन भाडेतत्त्वावर राहिली. वडील चंद्रकांत पांढरे यांनी यावेळी तिची खूप काळजी घेतली. आजारपणामुळे स्नायू दुर्बळ झाल्याने हस्ताक्षर खराब झाले होते. दहा महिन्यांच्या त्या कॉलेज प्रवासात तिचे काही दिवसांपुरते शिक्षिका होण्याचे स्वप्न साकार झाले.
बी.एड्.मध्ये शैलजा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. त्यानंतर त्याच संस्थेत २०१२-२०१५ या शैक्षणिक वर्षात बहिस्थ एम. ए (शिक्षणशास्त्र) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्या अभ्यासक्रमातही तिला प्रथम श्रेणी प्राप्त झाली.
त्यानंतर शैलजाने वर्तमानपत्रातील सदरात लेखन सुरू केले. सोशल मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून लेखन प्रवास सुरू झाला. ज्यात विनोदी पोस्ट आणि दशावतार संबंधित लेखन करू लागली. त्याचेच फळ म्हणून डिसेंबर २०२२ मध्ये ‘दिव्यांग नवसाहित्यिक पुरस्कार’ मिळाला. आजारपणात दिवसेंदिवस वाढ होत गेल्याने ती पूर्णपणे परावलंबी झाली. तिचे उठणे-बसणे आई-वडिलांवर अवलंबून राहिले. आई-वडील सोबत असल्यामुळेच माझ्या मनाला अपंगत्वाचे कोणतेच बंधन नव्हते, म्हणूनच तर इथंपर्यंतचा प्रवास गाठून इतरांसाठी प्रेरणा बनली आहे, असे ती आवर्जून सांगते.
चौकट
लेखमालिकेतील लेखनाचे कौतुक
सोशल मीडियावर ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ तसेच मालवणी भाषेतील लेखमालिका ‘तुमका म्हणान सांगतय’ यातून लेखन करत आहेत. आजूबाजूच्या विनोदी घटनांवर लेखन करतात. २ जुलै २०२३ ला सत्तरी गोवा येथील दशावतारी खलनायक मास्टर दामू जोशी यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राच्या अक्षर जुळवणी शैलजा पांढरे यांनी केली.
चौकट
विविध पुरस्कारांनी संस्थांकडून गौरव
शैलजा पांढरे विविध विषयांवर लेखन तसेच स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. त्यांच्या कार्याची दखल वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून घेण्यात आली असून, विविध पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
कोट
शैलेजाने आजारपणावर मात करत मिळविलेल्या यशामुळे इतरांसाठी ती ‘आयकॉन’ बनली आहे. वेगवेगळ्या विषयांवर लेखन, कविता करून विविध माध्यमांद्वारे आपले सुंदर विचार मांडत आहे. तिला सदैव सहकार्य देऊ. तिचा नावलौकिक असाच वाढत राहो, हीच सदिच्छा! इतरांनी सुद्धा व्यंगत्वाचा विचार बाजूला ठेवून आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर समाजात मानाने जगावे.
- बाळासाहेब पाटील, राज्य सचिव, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ
कोट
शैलेजाने अपंगत्वावर मात करत शिक्षण थांबवले नाही. आताच्या मुलांना अभ्यासाविषयी कशी ओढ असावी, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शैलजा होय. तिच्या जिद्दीला सलाम.
- दीनानाथ काळोजी, ग्रामस्थ, आजगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.