वसा वसुंधरा रक्षणाचा.........लोगो
(२५ ऑगस्ट टुडे २)
समुद्रातील कचऱ्यामुळे जलचर, प्राणी आणि परिसंस्थेचे मोठे नुकसान होते. जलचरांच्या शरीरात प्लास्टिक कचरा अडकतो, विषारी पदार्थ पाण्यात मिसळतात आणि माशांसह इतर जलचर मरतात. त्यामुळे सागरी परिसंस्था विस्कळीत होते. या कचऱ्यामुळे सी-फूड दूषित होत असून मानवी आरोग्याला धोका निर्माण होत आहे. तसेच मासेमारी आणि पर्यटन उद्योगांवरही नकारात्मक परिणाम होतो...!
- rat३१p१०.jpg-
25N88331
– डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
--ृ
समुद्री कचरा : एक भीषण वास्तव
कोकणाला ७२० किलोमीटरचा अथांग समुद्रकिनारा लाभला आहे. पण हा अथांग समुद्रकिनारा निर्मळ आणि स्वच्छ आहे का? तो भविष्यात तसा राहील का? असे प्रश्न आता पिंगा घालू लागले आहेत. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत पाहणी केली असता सर्वच किनारे प्रदूषित झाल्याचे लक्षात येते. मुसळधार पावसात दुथडी भरून वाहणारी नदी सागराला मिळते. मात्र, सागराला मिळताना ती मानवाने केलेल्या क्रांतीच्या सर्व चुकीच्या खुणा आपल्यासोबत वाहत घेऊन जाते. नदीवाटे आलेले सर्व काही समुद्र आपल्या पोटात ठेवत नाही. असे असले तरी मानव इतका पुढारलेला आहे की आता समुद्राच्या पोटातही न मावेल इतका कचरा नदीद्वारे समुद्रात जात आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठी क्रांती करता येते; त्याचप्रमाणे, छोट्या छोट्या कचऱ्याचे हिमालयाएवढा ढिग आता समुद्राच्या पोटात साठला आहे. मानवाची ‘मला काय त्याचे’ ही वृत्तीच याला कारणीभूत आहे. प्रत्येकाने ठरवलं की ‘माझ्याकडून एक कणही कचरा या धरित्रीवर जाणार नाही,’ तरच जलप्रदूषण थांबवणे शक्य आहे. मात्र सद्यःस्थिती उलट आहे. मुसळधार पावसात कोठेही टाकलेला कचरा नदी-नाल्यांद्वारे थेट समुद्रात पोहोचतो.
प्रचंड प्रमाणात असलेले मायक्रोप्लास्टिकचे कण किनारपट्टी भागातील वालुकामय प्रदेश पूर्णतः प्रदूषित करत आहेत. यासोबतच, समुद्रामध्ये असलेल्या आधुनिक डिझेल इंजिनवर चालणाऱ्या नौका आणि अनेक अपघातांमध्ये हजारो लिटर तेल समुद्रात मिसळले जाते. प्रतिवर्षी मुसळधार पावसानंतर उसळलेला समुद्र हे ऑइल मिश्रित कचरे समुद्रकिनाऱ्यावर फेकून देतो. अलिबाग ते रत्नागिरीपर्यंतच्या अनेक किनाऱ्यांवर या ऑइल मिश्रित कचऱ्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जलचरांवर विपरीत परिणाम होत आहे. कासव-निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही संस्था दरवर्षी हजारो कासवांच्या निर्मितीकडे लक्ष देतात. परंतु, त्याच कासवांना या ऑइल मिश्रित कचऱ्यामुळे प्राणास मुकावे लागत आहे. अनेक पक्ष्यांच्या पंखांना हानी पोहोचते. दाणा म्हणून अनावधानाने हा कचरा उचलल्याने प्लास्टिक किंवा इतर कण त्यांच्या पोटात जाऊन मृत्यू ओढवतो. माशांनाही मायक्रोप्लास्टिक आणि खाद्य यात फरक करता न आल्याने तेही या कणांचे बळी ठरत आहेत.
अनेकदा किनारपट्टी भागात विषारी सांडपाणी गेल्यामुळे आणि या कचऱ्यामुळे मेलेल्या माशांचे थर लागलेले दिसून येतात. कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदी वा नाल्यात सोडण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे, आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत.
प्रदूषित सागराच्या पाण्यात डायक्लोरोडिफेनिल ट्रिक्लोरोइथेन आणि पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल्स अशी घातक रसायने आढळतात, जी सजीवसृष्टीसाठी अत्यंत घातक ठरतात. दरवर्षी १०० दशलक्षाहून अधिक समुद्री जीव प्लास्टिक कचऱ्यामुळे मृत्युमुखी पडतात. यापुढे अधिक प्रमाणात निसर्ग आपल्यावर कोपणार, हे निश्चित आहे.
नुकतेच दापोलीच्या किनाऱ्यांवर अनेक ठिकाणी प्लास्टिक मिश्रित ऑइलच्या कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळते. त्यामुळे येथील जीवनावर गंभीर परिणाम होण्याची धास्ती किनारपट्टी भागातील ग्रामस्थांना वाटत आहे. किनाऱ्यावरील कचरा कितीही वेळा स्वच्छ केला, तरी जोपर्यंत डोंगरावरून किनाऱ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीची कचरा फेकण्याची सवय बंद होत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. त्यामुळे प्रत्येक लहानथोर व्यक्तीने रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळणे, ही काळाची गरज आहे.
(लेखक शाश्वत पर्यावरण विषयातील मानद डॉक्टरेट पदवीधर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.