फोटो ओळी
-rat१p५.jpg-
२५N८८६१८
साखरपा : गणेश आठल्ये
-rat१p६.jpg-
२५N८८६१९
शिपोशी येथील स्मारक
-----
अनाम क्रांतिकारक गणेश आठल्ये
शिपोशीने जपल्या स्मृती ; देशात पहिला बॉम्ब फोडणाऱ्यामध्ये सहभाग
अमित पंडित ; सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १ : अनाम विरा, जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात हे काव्य कुसुमाग्रजांनी रचले ते देशरक्षण करणाऱ्या सीमेवरच्या सैनिकांसाठी. पण हेच शब्द स्वातंत्र्य चळवळीतील असंख्य क्रांतिकारकांनाही चपखल लागू होतात. अशांपैकीच एक अनाम क्रांतिकारक म्हणजे शिपोशी येथील गणेश गोपाळ आठल्ये उर्फ जी अण्णा उर्फ ओ अॅटले हे आहेत. शिपोशी येथे सुरू केलेल्या शाळेत गणेशपंतांचा अर्धाकृती पुतळा उभारून त्यांच्या आठवणी जपल्या आहेत.
शिपोशी हे गाव तसे इतिहास प्रसिद्ध आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले. या गावात गणेश आठल्ये यांचा १४ नोव्हेंबर १८७९ या दिवशी जन्म झाला. वडील पोस्टात असल्याने सतत बदल्या होत. त्यामुळे गणेशपंतांनी शिपोशी, आलिबाग आणि दापोली अशा गावी शिक्षण घेत मॅट्रिक पूर्ण केले. पुढे ते पुण्याला गेले. लोकमान्यांचा प्रभाव असलेले पुणे, त्यामुळे गणेशपंतांवर क्रांतिकार्याचे बाळकडू मिळाले होते. पुण्याहून ते मुंबईला गिरगावात बदामवाडीत राहायला गेले. तेव्हा त्यांच्यातील क्रांतिकारक जागा झाला. त्यांचे गिरगावचे घर क्रांतिकारकांचे भेटण्याचे ठिकाण होते. त्यात प्रामुख्याने मराठी क्रांतिकारकांप्रमाणेच बंगाली क्रांतिकारकही होते. बदामवाडीतील घरी बॉम्ब बनवण्याचे प्रयत्न सुरू होते. पुण्यात त्यांनी आर्यसंघ ही संस्था स्थापन केली. दामूअण्णा जोशी आणि गोविंदराव बापट यांच्या मदतीने त्यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रयत्न सुरू होते. याची माहिती ब्रिटीशांना लागल्यामुळे त्यांनी पुण्यातील घरी छापा टाकला. गणेशपंत घरी नसल्यामुळे ते तिथून सटकले आणि मालवाहू बोटीतून ते थेट अमेरिकेला गेले. तिथून ते ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स या देशात गेले. सगळीकडे फिरत असताना त्यांनी बॉम्ब तयार करण्यात प्रावीण्य मिळवले होते.
भारतात परत आल्यावर त्यांना मुंबईला येणे शक्य नव्हते. कारण त्यांच्यावर मुंबई पोलिसांचे वॉरंट होते. म्हणून ते बंगालला गेले. तिथे त्यांनी बॉम्ब तयार करण्याची कला बंगाली क्रांतिकारकांना दिली. १९०८ साली खुदिराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी यांनी देशातला पहिला बॉम्ब फोडला आणि तो बॉम्ब तयार करण्यात सिंहाचा वाटा होता तो गणेश गोपाळ आठल्ये यांचा.
दरम्यान, अखंड दगदग आणि ताण यामुळे गणेशपंतांना क्षयाची बाधा झाली. तेव्हा ते बंगालमध्ये एका खेड्यात लपून होते. तिथेच त्यांचे देहावसान झाले. तो दिवस होता २ सप्टेंबर १९११. त्यावेळी त्यांच्या इच्छेप्रमाणे एका मराठी माणसाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. ती व्यक्ती होती डॉ. केशव बळिराम हेडगेवार. त्यांनीच पुढे काही महिन्यांनी गणेशपंतांच्या निधनाची बातमी शिपोशी येथे त्यांच्या घरी कळवली. त्यांचे चिरंजीव विनायक आठल्ये उर्फ बापू आठल्ये यांनी त्यांच्या स्मृती मिळवण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यांच्याकडे राखेच्या सहाय्याने काढलेले एक चित्र होते. पण पुढे १९५३ साली शिपोशीत आलेल्या पुरात ते चित्रही वाहून गेले. त्यांचे चिरंजीव सुरेश आठल्ये यांना एका कीर्तनकाराकडे एक फोटो मिळाला. त्यांनी तो फोटो हेडगेवारांना दाखवून खात्री करून घेतला.
चौकट
शाळेच्या आवारात अर्धाकृती पुतळा
स्वातंत्र्यानंतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांना मानसन्मान, वेतन मिळाले. पण विनायक उर्फ बापू आठल्ये यांनी मात्र शासनाकडून कोणतीही मदत अथवा सन्मान घेण्यास नकार दिला. त्यांनी शिपोशी गावात गणेशपंत आठल्ये यांचे स्मारक व्हावे एवढीच इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या हयातीत ते स्मारक पूर्ण होऊ शकले नाही. तो योग जुळून आला तो २००२ साली. बापू आठल्ये यांनी स्वत: जागा देऊन गावात एक शाळा सुरू केली आणि त्या शाळेच्या आवारात गणेशपंतांचा अर्धाकृती पुतळा असलेले स्मारक उभे राहिले आहे.
--------
कोट
गणेशपंत आठल्ये हे आमच्या घराण्याचे आदर्शस्थान आहेत. त्यांचे स्मारक शिक्षण संस्थेच्या रूपात माझ्या वडिलांनी उभारले याचा आनंद आहे. पुढच्या पिढीत मात्र त्यांचे स्मरण राहिले नाही याची खंत वाटते. असे अनाम क्रांतिकारक स्मृतीरूपात जपण्याची आवश्यकता आहे.
- सुरेश आठल्ये, नातू (गणेश आठल्ये यांचे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.