बोल बळीराजाचे--------लोगो
(३० ऑगस्ट टुडे ३)
गणपती गावाला गेले की, बळीराजाला पहिलं काम असतं ते बागा सफाईचं...कोकणात आंबा, काजूच्या बागांनी डोंगर भरलेत. यंदा पाऊस तसा लवकर सुरू झाला. मध्ये मध्ये उघडीप. कधी उन्हाचा छान कवडसा..अगदी मोठा ताण नसला तरी दोन-चार दिवसांचा सुखवा आणि पुन्हा जोरदार पाऊस यांनी या बागा टाळटूळ, करपेल, दिंडा यांनी नुसत्या भरल्यायत. जमिनीला किरण शिवणार नाही, अशी गच्च झाडी झालीत. त्यात ज्यांच्याकडे गुरंढोरं आहेत ते जरा तरी सुखी आहेत...म्हणजे बागेत फिरू तरी शकतायत; पण ज्यांच्या बागेत गुरं फिरत नाहीत त्यात माणसांना फिरणंही अवघड अशी परिस्थिती आहे. काही मालकांनी अगदी मुळांसह सर्व झाडंझुडपं काढून बागा पुरत्या साफ केल्यायत.; पण सर्रास असं नाहीये. त्यामुळे आता भातशेतीला पिवळ पडेपर्यंत बागासफाई हे एकच काम!
rat५p२९.jpg-
25N89700
- जयंत फडके
जांभूळआड पूर्णगड, रत्नागिरी
-----
बागा चकाचक करताना
बळीराजा चकाचक
जातीच्या शेतकऱ्यानं अजून गुरंढोरं सोडली नाहीत आणि बागाही खणून बोडक्या केलेल्या नाहीत. शक्य आहे की, वीस-पंचवीस वर्षापूर्वीच्या टाळमातीइतका वेळ आणि मनुष्यबळ नसेल; पण आंबा-काजूशिवाय अन्य झाडच बागेत नको इतकाही तो व्यवहारी झालेला नाही. बागा ग्रासकटरनं साफ करता यायला हव्या या सोपं करण्याच्या नादात अन्य झाडेच बागेत न ठेवणाऱ्यांचे आता कुठे डोळे उघडायला लागलेत. निसर्गतःच प्रत्येक जीवाचा जीवनक्रम आहेच. आपण अन्य झाडंच शिल्लक ठेवलं नाही तर असंख्य कीटक, वाळवी, कीड-मुंग्या, कोळी, इ. त्यांचा जीवनक्रम शेवटी कुठे पूर्ण करणार? आपण लावलेल्या झाडांवरच ना? ‘जिवो जिवस्य जिवनम्’ हे माझा तथाकथित अशिक्षित शेतकरी बांधव अजूनही अंमलात आणतोय; मात्र महागुरू, शेतीतज्ज्ञ नवनवीन विषारी रसायनं आणून हे कीटकच कसे नाहीसे करता येतील यावर लाखो रुपयांचे फवारे उडवतायंत. ते कीटक तर नाहीसे होत नाहीतच; पण नवनवीन अधिक विद्ध्वंसक प्रजाती निर्माण होतायत.. या दुष्टचक्राचं मूळ आत्ताच्या बळीराजाच्या साफसफाईच्या कामात दडलंय; पण यावर संशोधनात्मक चर्चा कुठेच नाही.
म्हणावी तशी सधन लागवड अजूनतरी कोकणात बागायतीत नाही. किंजळ, आइन, हसाणी-धामणी, करंजसारखे इमारती, फर्निचरसाठी उपयुक्त वृक्ष आणि कुडा, करवंद, आकाबोकी, उक्षी, तोरणंसारखी अनंत प्रकारची झुडपं ही कोकणची संपत्ती आहे. आंबा एके आंबा या एकल लागवडीने आपण निसर्गाबरोबरचं स्वतःचेही नुकसान करत आहोत. जळाऊ लाकूड, इमारती लाकूड, औषधी आणि कोकणीमेवा असणारी झुडपे ही उत्पन्नाचे मार्ग आहेत. दशपर्णी अर्कासाठी आवश्यक झाडंही मुद्दाम राखता येतील. दामदुप्पट आंब्यातून पैसा मिळवण्यासाठी देखभाल खर्चाचे पैसे याच वनराईतून उभे राहातात. मृदसंधारण, जलसंधारण यांचं अनोखं गणित या काय तोडून खणून काढायचं यापेक्षा काय राखून ठेवायचं, यात दडलेलं आहे. माझ्या बळीराजानं आत्ता साफसफाई करताना, बागा चकचकीत करताना या वेगळ्या दृष्टीचा जरूर विचार करावा. आंबा-काजूच्या छायेखालील भागात कोणतीही रानटी झाडं नक्कीच नसावी; पण ‘सुरक्षित अंतर’ राखून मोकळ्या जागेत कमी उंचीची अनेक झाडंझुडपं नियंत्रित प्रमाणात वाढू द्यावीत. आंबा-काजूच्या छायेखालील भागात साफ केलेला टाळटुळ, करपेल, दिंडासारख्या हिरव्या सेंद्रिय घटकांचा थर बांगडी पद्धतीत न करता हा भाग पूर्ण झाकेल, अशा पद्धतीने केला तर छान मल्चिंग होईल. काटा नसलेलं सगळं बायोमास अशा पद्धतीनं वापरलं तर जमिन सजीव व्हायला आणि झालेली सजीव राहायला नक्कीच मदत होईल. इमारती लाकूड, जळावू लाकूड देणारी झाडं आत्ता न खडसता शिमग्याआधी खडसण्याची पारंपरिक पद्धत खरंच योग्य होती. ‘कवळं’ तोडणं अवैज्ञानिक ठरवून आपणच वाट लावली. इतर झुडपं वनौषधी आणि कोकणमेव्याचं वर्षानुवर्ष चालणारं चक्र सुरू करून देतील. यात आपल्या मुख्य पीक आंबा-काजूला दुय्यम स्थान द्यावं, असं बिल्कुल नाही; पण इतर वनस्पतीही तितक्याच पूरक आणि आवश्यक आहेत, हे समजून आत्ताची बागांची सफाई व्हायला हवी.
आंबा-काजूमध्ये आंतरपिकाचा विचार अभावानेच होतो; पण हळद, आलं आणि अन्य पावसाच्या पाण्यावरच होणाऱ्या कंदपिकांचा विचार माझ्या बळीराजानं यावर्षी केला नसेल तर पुढील वर्षी नक्कीच करावा. लहरी हवामान, निसर्ग उत्पन्नाला नफ्या-तोट्याच्या हिंदोळ्यावर बसवतोच आहे; पण देखभालीची कामं उत्पन्नावर अवलंबून नाहीत म्हणून ‘खर्चात बचत हेच उत्पन्न,’ असं गणित मांडून वार्षिक देखभालीचे खर्च माझ्या बळीराजाने अशा पर्यायी, पूरक मार्गाने उभे करायला हवे तरच, आंबा-काजूचं उत्पन्न निव्वळ उत्पन्न म्हणता येईल. खरंतर, ही घडी आपणच विस्कटलीयं. आपणच जाग्यावर आणायला हवी नाहीतर बागा चकाचक करताना माझा बळीराजाच चकाचक व्हायचा.
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.