कोकण रेल्वेची ‘रो-रो’ कार सेवा फसली
पाच वाहनांवर थांबला प्रयोग; परतीच्या प्रवासात एकही बुकिंग नाही
सकाळ
चिपळूण, ता. ८ ः कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी कोलाड-नांदगावरोड-वेर्णा दरम्यान चालवण्यात आलेल्या बहुचर्चित पहिल्या-वहिल्या ‘रो-रो कार’ सेवेचा प्रयोग फसला आहे. २३ ऑगस्टला अवघ्या पाच वाहनांसह धावलेल्या ‘रो-रो’ कार सेवेची नंतर कोकणवासियांना धडधड ऐकायला मिळाली नाही. परतीलाही अजूनतरी ‘रो-रो’ कार सेवेच्या लाभासाठी गणेशभक्तांकडून ना विचारणा झाली.. ना बुकिंग. यामुळे ‘रो-रो’ कार सेवेचा पुरता फज्जाच उडाला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी अडथळ्यांची शर्यंत पार करत गाव गाठले. गणेशभक्तांना गाव गाठताना कराव्या लागणाऱ्या कसरतीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन पुढे सरसावले होते. यासाठी गणेशभक्तांची हलक्या वजनाची वाहने वाहून नेण्यासाठी कोकण मार्गावर प्रथमच ‘रो-रो’ कार सेवेचा प्रयोग करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीपासूनच ‘रो-रो’ कार सेवेकडे गणेशभक्तांनी पाठ फिरवली. ‘रो-रो’ कार सेवेऐवजी कोकण मार्गावर जादा विशेष गाडी चालवण्याचा आग्रह कोकणवासीयांनी धरला होता.
कोकण रेल्वे प्रशासनाने अखेरपर्यंत अट्टहास न सोडता सेवेच्या नोंदणीसाठी सलग चारवेळा मुदतवाढीचा ‘फंडा’ वापरूनही गणेशभक्तांचा ‘थंडा’च प्रतिसाद लाभला. कोलाड येथे चढणारी वाहने थेट नांदगावरोड अथवा वेर्णा स्थानकात उतरवण्यात येणार होते. यासाठी भाडेही अवाजवी आकारण्यात येणार होते. ‘नाकापेक्षा मोती जड’ अशीच अवस्था झाल्याने सेवेसाठीच अवघ्या ५ जणांचीच नोंदणी झाली होती. किमान १६ वाहनांची नोंदणी आवश्यक होती. अशा बिकट परिस्थितीत कोकण रेल्वे प्रशासनाने पहिली-वहिली ‘रो-रो’ कार सेवा चालवली.
पहिल्या दिवशी म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी धावलेल्या ‘रो-रो’ कार सेवेचा अपवाद वगळता त्यानंतर ‘रो-रो’ कार सेवा धावलीच नाही. यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाचा भ्रमनिरास झाला. परतीच्या प्रवासात तरी ‘रो-रो’ कार सेवेला गणेशभक्तांचा प्रतिसाद मिळेल, अशी कोकण रेल्वे प्रशासनाने बांधलेली अटकळ तूर्तास फोल ठरली आहे. एकाचीही नोंदणी झालेली नाही. यामुळे परतीच्या प्रवासात ‘रो-रो’ कार सेवा धावण्याची आशा धुळीस मिळणार आहे.
चौकट
कोटा पूर्ण झाल्यास ‘रो-रो’ चालवणार
कोकण मार्गावर चालवण्यात आलेल्या ‘रो-रो’ कार सेवेसाठी किमान परतीच्या प्रवासात गणेशभक्तांचा प्रतिसाद मिळेल, अशी आशा होती. मात्र, परतीलाही अजिबातच प्रतिसाद मिळालेला नाही. प्रवाशांकडून मागणी आल्यास अन् वाहनांचा कोटा पूर्ण झाल्यास ‘रो-रो’ कार सेवा चालवण्यात येईल, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.