-rat१०p२२.jpg-
P२५N९०६५२
रत्नागिरी ः जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली.
----
जनसुरक्षा विधेयकाविरोधात निदर्शने
महाविकास आघाडी ; शासनाविरोधात घोषणाबाजी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : शासनाने प्रस्तावित केलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीने लांजा, चिपळूण, रत्नागिरी येथे निदर्शने केली. रत्नागिरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, लांजा शहरात आणि चिपळूण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. हुकूमशाही विधेयक मागे घ्या, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला. जनसुरक्षा हे विधेयक ‘जनविरोधी‘ आणि ‘घटनाविरोधी‘ आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकशाही हक्कांवर होत असलेल्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
नव्या विधेयकानुसार सरकारला कोणत्याही नागरिकावर केवळ संशयावरून अटक, चौकशी किंवा नजरकैद करण्याचे अमर्याद अधिकार मिळतील, असा आरोप करण्यात आला. यामुळे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला धोका निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. महाविकास आघाडीने हे विधेयक त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. रत्नागिरीतील आंदोलनात शिवसेना उपनेते बाळ माने, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय पुनसकर आदी सहभागी झाले होते.
लांजा येथे निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष नसरुद्दीन सय्यद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश राणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत जाधव आदी सहभागी झाले होते.
चिपळूण येथे जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात जनसुरक्षा विधेयकाला जनविरोधी, घटनाविरोधी आणि हुकूमशाही प्रवृत्ती वाढवणारे असे संबोधत तीव्र विरोध दर्शवण्यात आला. मुराद अडरेकर, बाळा कदम व लियाकत शाह यांनी शासनाच्या हुकूमशाही विरोधात तीव्र भूमिका मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.