‘इंटरव्हेशन रेडिओलॉजी’द्वारे रुग्णांवर उपचार
वालावलकर रुग्णालय ; छोट्या सुईच्या साह्याने अचूक वेध
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १० : येथील वालावलकर रुग्णालयात चार रुग्णांवर इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले. छोट्या सुईच्या साह्याने शरीरातील आजारी भागावर उपचार करणारी ही पद्धत आता कोकणातही उपलब्ध झाली असून ती यशस्वीपणे राबवली जात आहे.
नुकतेच टाटा हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट डॉ. शरद चंद्रा यांनी वालावलकर रुग्णालयात चार रुग्णांवर ही पद्धत यशस्वीरीत्या वापरली. त्यामध्ये पहिल्या रुग्णावरील उपचारामध्ये हिमोडायलिसिससाठी आवश्यक असलेला परमाकॅथ कॅथेटर रुग्णाच्या मानेच्या शिरेत बसवण्यात आला आहे. त्यामुळे डायलिसिसची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. दुसऱ्या रुग्णाला स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे पित्तनलिकेत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे त्याला कावीळ झाली होती. छोट्या सुईद्वारे यकृतातून पित्तनलिकेत प्रवेश करून मेटल स्टेन्ट बसवण्यात आला आहे. स्टेन्टमुळे पित्तप्रवाह सुरळीत होईल व त्यानंतर केमोथेरपी सुरू करता येणार आहे. तिसऱ्या रुग्णाच्या पित्ताशयाच्या नलिकेचा कॅन्सर असल्याने कावीळ झाली होती. त्या रुग्णालाही पीटीबीडी पद्धतीने मेटल स्टेन्ट बसवण्यात आला असून केमोथेरपीसाठी आवश्यक ती पूर्वतयारी झाली आहे. चौथ्या रुग्णाच्या जठराच्या पायलोरस भागात कॅन्सरची गाठ असल्यामुळे रुग्णास पोटदुखी व रक्ताच्या उलट्या होत होत्या. डॉ. श्रीपाद बाणवली यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी झाली. इंडोस्कोपीद्वारे गाठीतून रक्तस्राव होत असल्याचे निदान झाले. त्यानंतर सीटी अॅजिओग्राफी करून रक्तस्रावाचा स्रोत निश्चित केला गेला. डीएसए टेस्टद्वारे जांघेतील शिरेतून सूक्ष्म कॅथेटर टाकून रक्तवाहिनी औषधाने बंद करण्यात आली. यामुळे रक्तस्राव तत्काळ थांबवण्यात यश आले आहे.
कोट
इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी प्रक्रियेमध्ये छोट्या सुईच्या माध्यमातून शरीरातील आजारी भागावर अचूक उपचार करता येतात. यासाठी संपूर्ण भूल देणे किंवा मोठ्या प्रमाणावर चिरफाड करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होतो व उपचारालाही चांगला प्रतिसाद देतो. मुंबईतील टाटा रुग्णालयाशी संलग्न असल्याने वालावलकर रुग्णालयातही त्या दर्जाच्या वैद्यकीय सेवा दिल्या जातात.
--डॉ. सुवर्णा पाटील, वैद्यकीय संचालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.