swt1028.jpg
90703
तेरेखोलः येथील नदीपात्रात दिवसाढवळ्या दिसणाऱ्या मगरी.
तेरेखोल नदीकाठ सोळा मगरींच्या विळख्यात
ग्रामस्थ, शेतकरी, मच्छीमार भयभीत; वनविभागाकडे तातडीच्या सुरक्षेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १०ः येथील तेरेखोल नदीपात्रात दिवसाढवळ्या मगरींचा वावर वाढू लागल्याने बांदा परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांना नदीत पहुडलेल्या तब्बल सोळा मोठ्या मगरी दिसल्या. त्यामुळे नदीकाठच्या वस्त्या, शेतकरी, मासेमार तसेच नदीकाठी खेळणारी लहान मुले यांच्यासमोर मोठा धोका निर्माण झाला आहे.
तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्या हजारोंच्या घरात आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी या मगरी पहुडलेल्या स्थितीत आढळतात. बांदा परिसरात या मगरींचा सर्वाधिक वावर असल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज तेरेखोल नदीपात्रातील आळवाडा परिसरात तब्बल १६ मोठ्या मगरी या पहुडलेल्या स्थितीत आढळल्या. येथील हॉटेल व्यावसायिक तुषार धामापूरकर यांनी या मगरींचे छायाचित्र समाज माध्यमांवर टाकल्याने या मगरींना पाहण्यासाठी तेरेखोल नदी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून तेरेखोल नदीत विविध ठिकाणी मगरी दिसू लागल्या आहेत. विशेष म्हणजे या मगरी दिवसाढवळ्या पाण्यावर तरंगताना अथवा पाणथळ जागी विसावताना आढळून येत आहेत. त्यामुळे नदीकाठाने फिरणाऱ्या नागरिकांना धडकी भरली आहे. शेतामध्ये पाणी खेचण्यासाठी, मासेमारीसाठी किंवा इतर कामानिमित्ताने जाणाऱ्या शेतकऱ्यांचे कामही यामुळे धोकादायक ठरत आहे.
ग्रामस्थांच्या मते, नदीकाठच्या परिसरात शाळकरी मुले सुद्धा खेळत असतात. अशा वेळी एखादी अपघाताची घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. वनविभागाने तातडीने गस्त वाढवून मगरी सुरक्षितरित्या पकडून नदीबाहेर हलवाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांनी या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले असून, एखादी जीवितहानी होण्यापूर्वी खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.