91391
एकाच दिवशी १०८४ प्रकरणांची तडजोड
राष्ट्रीय लोक न्यायालयातून १८ कोटींची वसुली; अपीलमुक्त निकालामुळे वेळ, पैशाची बचत
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः जिल्ह्यात २०२५ या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोक न्यायालयात तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी १०८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून १८ कोटी ७२ लाख ९४ हजार ८५ रुपयांची वसुली झाली. अपीलमुक्त निकालामुळे नागरिकांचा वेळ व पैशाची बचत झाली.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या उपस्थितीमध्ये व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता. १३) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले होते.
राष्ट्रीय लोक न्यायालयासाठी सर्व तालुका न्यायालयात प्रत्येकी एक पॅनेल तसेच जिल्हा न्यायालयात दोन पॅनेल नेमले होते. पॅनेल क्र.१ मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. देशपांडे, विधिज्ञ निकिता हरकुळकर यांनी काम पाहिले. पॅनेल क्र. २ मध्ये दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. चेंडके, विधिज्ञ एन. पी. मठकर यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा गुंडेवाडी उपस्थित होत्या. या पॅनेलसमोर दिवाणी दावे, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेशाबाबतची प्रकरणे, कर्ज वसुली प्रकरणे व सर्व प्रकारची वादपूर्व प्रकरणे तडजोड होऊन निकाली झाली.
राष्ट्रीय लोक न्यायालयात पक्षकार व विधिज्ञ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. राष्ट्रीय लोक न्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयातील न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले. पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.
------
सामंजस्यातून निकाल, जिव्हाळा टिकून
या राष्ट्रीय लोक न्यायालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १०८४ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. या सर्व प्रकरणांतून १८ कोटी ७२ लाख ९४ हजार ८५ रुपयांची तडजोडीची रक्कम वसूल झाली. तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये सामंजस्यातून निकाल झाल्याने जिव्हाळा टिकून राहिला आहे. या तडजोडीच्या निकालांविरुद्ध अपील होत नसल्याने वेळेची व पैशाची बचत देखील झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.