दिशा ट्रस्टमार्फत
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
राजापूर ः पुणे येथील दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टमार्फत देण्यात येणार्या शिष्यवृत्तीसाठी तालुक्यातील पात्र असलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हा शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम शनिवारी (ता. २०) सकाळी १० वाजता राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाला पुणे येथील बी. एल. स्वामी, दिशा परिवारचे संस्थापक राजाभाऊ चव्हाण, अरुण कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन दिशा परिवारचे राजापूरचे समन्वयक गजानन जोशी, अनंत रानडे, बी. के. गोंडाळ यांनी केले आहे.
-------------
जलतरण स्पर्धेत
प्रेरणा मोंडे प्रथम
राजापूर ः तालुक्यातील ओणी येथील नूतन विद्यामंदिरची विद्यार्थिनी प्रेरणा मोंडे हिने जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये १०० मी. फ्री स्टाईल पोहणे, ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक पोहणे या प्रकारात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला. गार्गी मोंडे हिने ५० मी. फ्री स्टाईल पोहणे या प्रकारात जिल्हास्तरीय तिसरा, ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक पोहणे प्रकारात जिल्हास्तरीय पहिला क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचे ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि प्रशाळा यांच्यासह तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.
----------
भाजप कार्यकारिणीत
मंडणगडमधील ७ जण
मंडणगड ः भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या ८९ कार्यकर्त्यांची कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार मंडणगड तालुक्यातील सात कार्यकर्त्यांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश केला आहे. त्यानुसार माजी तालकाध्यक्ष अप्पासाहेब मोरे यांची जिल्हा चिटणीस पदावर, पदवीधर प्रकोष्ठ संयोजकपदी अजय दळवी, सोशल मीडिया संयोजक वैभव नारकर, उद्योजक आघाडी संयोजकपदी गिरीश जोशी, रवीकुमार मिश्रा जिल्हा संयोजकपदी, विश्वदास लोखंडे, प्रिया दरीपकर विशेष आमंत्रित म्हणून निवडले गेले आहेत.
---------