92697
वीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
सावंतवाडीत ‘काम बंद’मुळे कारवाई; स्वच्छतेवर परिणाम झाल्याचा ठेकेदार कंपनीचा ठपका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः येथील पालिकेच्या हद्दीतील सफाई करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करत काम बंद आंदोलन केल्याने तब्बल वीस कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तशा प्रकारचे पत्र संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब दिनकर घाडगे यांनी दिले आहे.
येथील पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम एका संस्थेकडे कंत्राटी पद्धतीने आहे. या संस्थेने १६ मे २०२५ ते १५ मे २०२६ या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीवर सफाई कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. नेमणुका करताना त्यांनी कामाच्या अटी व शर्थी लादल्या होत्या. यामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या संपात सहभागी होण्यास मनाई होती. संप केल्यास आपणास कोणतेही कारण देता कामावरून टाकण्यात येईल, असेही म्हटले होते. परंतु, संस्थेच्या या अटींचे उल्लंघन करत काही कर्मचाऱ्यांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये बेमुदत संप पुकारला. यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांना त्याचा लाभ त्रास सहन करावा लागला होता.
संस्थेने कामावरून काढून टाकण्याबाबत दिलेल्या पत्रामध्ये म्हटले की, ‘कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पगार, पीएफ आणि ईएसआयसीची रक्कम खात्यात जमा होत असूनही संप केला. सणासुदीच्या काळात शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आपण संस्थेने सांगितलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून संप करत आहात. यामुळे सावंतवाडी पालिकेने संस्थेवर दंडात्मक कारवाई केली आहे किंवा करणार आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येत आहे. तसेच, दंडात्मक कारवाईमुळे संस्थेला झालेला आर्थिक भुर्दंड सप्टेंबर महिन्याच्या पगारातून कपात करण्यात येईल.’ काढून टाकण्यात आलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या जागी नव्या कामगारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्न आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत आपल्या काही मागण्या पालिका प्रशासनाकडे ठेवल्या होत्या. त्यांनी वेळोवेळी तसा पत्र व्यवहारही केला होता. मात्र, मागण्या पूर्ण होत नसल्याने आणि त्यांच्यावर अन्याय होत असल्याने त्यांनी उपोषणासारखा मार्ग अवलंबविला होता. १५ सप्टेंबरला पालिकेच्या तब्बल साठ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोरच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन छेडले होते. रात्री उशिरा प्रांत अधिकारी हेमंत निकम आणि प्रभारी मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत यावर तोडगा निघाला होता. मात्र, आता काहींना कामावरूनच काढून टाकल्याने श्री. साळगावकर आणि उर्वरित कंत्राटी सफाई कामगार नेमकी कोणती भूमिका घेतात? हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
--------------
कोट
पालिकेच्या काही कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत असल्याच्या नोटिसा बजावल्याचे समजते. परंतु, मी कामानिमित्त बाहेर असल्याने नेमकी वस्तूस्थिती काय आहे? पालिकेला तशा प्रकारच्या काही पत्रव्यवहार आहे का? या संदर्भात सावंतवाडीत आल्यानंतर माहिती घेऊन कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन.
- हेमंत निकम, प्रांताधिकारी तथा प्रशासन सावंतवाडी नगरपालिका
------------
पालिकेच्या एकाही कंत्राटी सफाई कामावरून कमी केलेले नाही. सर्व कामगार कामावरती रुजू आहेत आणि काम करत आहेत. या संदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. परंतु, कुठल्याही कंत्राटी कामगारावरती कारवाई होणार नाही याची दक्षता आम्ही संघटनेच्या माध्यमातून घेणार आहोत. संघटनेचे बळ आम्ही त्यांच्या पाठीशी देणार आहोत. ही लढाई आता कायद्यानेच लढली जाणार आहे. परंतु कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळून देऊ.
- बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष
-------------
येथील पालिकेमध्ये अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या २० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना संबधित ठेकेदाराने कामावरून कमी करण्याची नोटीस देणे हे अत्यंत चुकीची आणि हास्यास्पद आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम आणि माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी यशस्वी शिष्टाई करून कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेतले होते, असे असतानाही, ठेकेदार या गरीब कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस बजावतो. या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्तबगार प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी स्वतः लक्ष घालावे.
- मंगेश तळवणेकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती
---------------
आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि वृद्ध आई-वडिलांच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी आज आम्हाला आमच्याच घामाच्या पैशांसाठी झगडावे लागत आहे, हे खूप मोठे दुःख आहे. आम्ही रोज घाणीत काम करतो. गोरगरीब सफाई कामगारांचे यापुढे असे हाल होऊ नयेत. प्रशासनाने अशा फसवे व अत्याचारी ठेकेदारांकडून आमची कमाई परत मिळवून द्यावी. तसेच, आम्हाला कामावरून काढून टाकण्याची भाषा वापरणाऱ्या अशा ठेकेदारांना प्रशासनाने आणि जनतेने या शहरातून कायमस्वरूपी निलंबित करावे. हा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा दिवस असेल.
- बाबू बारागडे, सफाई कामगार संघटना सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.