नवरात्रोत्सवानंतर राज ठाकरे कोकणात
खेड ः मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर पक्षाने बडतर्फीची कारवाई केल्यानंतर कोकणातील ‘राज’कारण ढवळून निघाले आहे. खेडेकर व समर्थकांचा भाजप प्रवेशही निश्चित झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौऱ्यावर येणार आहेत. खेडेकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी केली. अनपेक्षितपणे झालेल्या बडतर्फीच्या कारवाईनंतर खेडेकर यांनाही धक्का बसला. त्यांच्या समर्थकांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारत खेडेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. खेडेकर व समर्थकांचा २३ ला भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. कोकणातील मनसेला अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौरा करणार आहेत.
लवेल विद्यालयाची प्रतीक्षा कांबळे अव्वल
खेड : एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय मराठी कथाकथन स्पर्धेत लवेल येथील पद्मश्री अण्णासाहेब बेहरे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रतीक्षा कांबळेने अव्वल स्थान पटकावले. भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील आर्या खेडेकरने द्वितीय, तर एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलमधील सोहम शिंदेने तृतीय क्रमांक मिळवला. परीक्षण रोहित भोळे, गोखले, कुंभार यांनी केले. या वेळी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, संस्थाध्यक्ष अहमद मुकादम, सदस्य वाहिद मुकादम, माजिद खतीब, समन्वयक सेबास्टियन जॉय, मुख्याध्यापिका सारंग, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत खेडेकर आदी उपस्थित होते.
‘आयसीएस’मध्ये प्रमोशन ब्रिज उपक्रम
खेड : ‘आयसीएस’ महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत हायरएज्युकेशन प्रमोशन ब्रिज उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंद भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या उपक्रमात तालुक्यातील विविध १२ कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व वरिष्ठ शिक्षक सहभागी झाले होते. अॅड. भोसले यांनी सहजीवन शिक्षण संस्थेची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. या प्रसंगी समन्वयक डॉ. शेख यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. भालेराव यांनी केले, तर डॉ. साळुंखे यांनी आभार मानले.
लांज्यात आज बौद्धजन संघाची सभा
लांजा ः तालुक्यात सामाजिक व धार्मिक काम करणाऱ्या लांजा तालुका बौद्धजन संघ या संस्थेची सर्वसाधारण सभा २१ रोजी सकाळी ११ वाजता कुलकर्णी-काळे छात्रालय येथे आयोजित करण्यात आली असून, या सभेत संस्थेची पंचवार्षिक नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. लांजा तालुक्यातील बौद्ध समाजाची ही एकमेव संस्था आहे. ही संस्था बौद्ध समाजाचे नेतृत्व करते. बौद्ध समाजामध्ये शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, शेती व औद्योगिक, कला-क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, स्वयंरोजगार आणि महिला सक्षमीकरण व आर्थिक अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून बौद्ध समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता ही संघटना निर्माण झाली आहे. वधू-वर मेळावे, धम्म शिबिरे, स्वयंरोजगारासाठी उद्योग शिबिरे, महिला सक्षमीकरणांकरिता महिला मिळावे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांवर अभिवादन परीक्षा, जयंती, एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा अभ्यास उपक्रम ही संस्था राबवत आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाल संपत आल्यामुळे नवीन कार्यकारी मंडळ निवडीकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लांजा तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
----