नवदुर्गा------लोगो
rat22p14.jpg-
93218
ज्येष्ठ रंगकर्मी प्रेमा मुरकर
-----------
आयुष्याच्या संघर्षात रंगभूमीची साथ
प्रेमा मुरकर यांची ४० वर्षांची सेवा; आईच्या पश्चात पाच बहिणींचे शिक्षण आणि विवाह
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : सगळ्या गोष्टी सुरळीत होत होत्या, आयुष्य स्थिरस्थावर होत असतानाच आईने जगाचा निरोप घेतला. आम्हा पाच भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आता पुढे काय, हा प्रश्न समोर होता. एकीकडे आईवरचं अपार प्रेम आणि तिच्या जाण्याचं दुःख, तर दुसरीकडे पाच बहिणींची जबाबदारी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे अश्रू दाबून ठामपणे उभी राहण्याचा निर्धार केला. कर्तव्य आणि जबाबदारी टाळणं शक्यच नव्हतं आणि म्हणूनच, आईच्या निधनानंतर २० व्या दिवशी रंगदेवतेची सेवा करण्यासाठी रंगमंचावर उभी राहिले. चिंचखरी येथील नाटकात भूमिका साकारली आणि तिथून रंगयात्रेचा माझा प्रवास सुरू झाला. गेली ४० वर्षे रंगभूमीची अखंड सेवा करत राहिले, त्यातूनच माझे कुटुंबही उभे राहिले, असा प्रवास ज्येष्ठ रंगकर्मी प्रेमाताई मुरकर यांनी व्यक्त केला.
मुरकर यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या बाराव्या वर्षीच ‘कलीचा संचार’ या जयगड ग्रुपच्या नाटकातून रंगमंचावर संचार सुरू झाला. त्यानंतर परटवणे येथील नाट्यग्रुपमधून नाटकाला सुरुवात झाली. आर्थिक परिस्थितीमुळे प्रेमाताईंना, चेहऱ्याला लावलेला रंग उतरवता येत नव्हता. नवीन गाव, नवीन ग्रुप, नवीन नाटक, नवीन चेहरे यांसह त्यांचे आयुष्य पुढे जात होते. गावागावांत तर परजिल्ह्यांतही मुरकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अनेक संस्थांना त्यांनी उभारी दिली, सहकार्य केले, वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.
४० वर्षे त्यांनी नाट्यसंसार थाटला होता. स्वतःचा संसार न मांडता खूप मेहनतीने, कष्टाने, चांगल्या मानसिकतेमधून आपल्या पाच बहिणींना सांभाळून त्यांचे शिक्षण आणि पुढे त्यांचे विवाह करून दिले. ताईला आयुष्याच्या या खडतर वाटेवर आधार होता, तो गगनगिरी महाराज हाक मारताच ते धावून यायचे. त्यांच्याच आशीर्वादाने आतापर्यंतची वाटचाल, सुखकर आणि आनंदी झाली, असे त्या सांगतात. नाटकाच्या माध्यमातून अनेक ठिकाणची अनेक माणसे जोडली गेली. त्यांचे प्रेम मिळाले आणि म्हणूनच सुमारे ७५० नाटकांतून मुरकर यांनी भूमिका केल्या. शेकडो नाटकांनी ताईला आनंद दिला. आयुष्य उभं करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं.
सर्व काही छान सुरू असतानाच प्रेमाताईंचे वडील १९९६ मध्ये सोडून गेले. शहरातील घुडेवठार येथे भाड्याच्या खोलीत राहून हा नाट्यप्रपंच सुरू झाला. त्यानंतर माळनाक्यात काही वर्षे वास्तव्य केल्यानंतर, गेली ४० वर्षे शांतीनगर येथील स्वतःच्या गगनगिरी कृपामध्ये राहत आहेत. त्या म्हणतात, त्यांच्या आयुष्याला बहीण आणि मेहुण्यांनी चांगली साथ दिली म्हणून माझे आयुष्य सुसह्य झाले. नात्यातल्या आणि नात्याने जोडलेल्या माणसांनी ताईवर खूप प्रेम केले, सहकार्य केले. गगनगिरी कृपा ही स्वतःची पर्णकुटी ताईने स्वतःच्या कष्टातून उभी केली आणि त्या पर्णकुटीत ती सुखाने राहत आहे.
चौकट
दिग्गज कलाकारांचा सहवास आणि मार्गदर्शन
संपली रात्र तिमिराची आणि रणांगार या दोन नाटकांच्या प्रथम प्रयोगामध्ये काम करण्याची संधी ताईला मिळाली आणि त्यानंतर त्या दोन्ही नाटकांच्या मुखपृष्ठावर फोटो छापला गेला. भाग्याचा क्षण असा की, मायेचा संसार आणि कुलांगार या दोन नाटकांसाठी प्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकर यांचे संगीतासाठी मार्गदर्शन मिळाले. जीवनयात्रा या श्रीकांत पाटील लिखित दिग्दर्शित एकांकिकेमध्ये भाग घेऊन सावंतवाडी, कणकवली आणि देवगड येथील स्पर्धांमध्ये उत्तम अभिनय करून एकांकिकेला बक्षीस मिळवून दिले. हौशी रंगभूमीवरील अनेक दिग्दर्शक आणि दिग्गज संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या नाटकात भूमिका करण्याची संधी मिळाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.