‘शिक्षक भारती’चे उद्या सिंधुदुर्गनगरीत ‘धरणे’
मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानेच आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या ४४३ शिक्षकांना कार्यमुक्त करावे यांसह विविध १४ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती गुरुवारी (ता. २५) दुपारी २.३० ते ६ या वेळेत लक्षवेधी धरणे आंदोलन करणार आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. संघटनेच्या शिष्टमंडळास शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्याकडे वेळ मागूनही वेळ दिली जात नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लक्ष वेधण्यासाठी २५ ला दुपारी २.३० ते ६ या वेळेत लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.
१२ वर्षे प्रलंबित असलेल्या २००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांची डीसीपीएस रक्कम व सहाव्या वेतन आयोगाचे एक ते पाच हप्ते त्यांच्या भविष्य निर्वाह खात्यात जमा करण्यात यावेत, १४ वर्षे प्रलंबित असलेल्या निमशिक्षकांची नियुक्ती शासन दिनांकपासून करण्यात यावी व फरकाची रक्कम मिळावी, दोन वर्ष प्रलंबित असलेली वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुरी मिळावी, तीन वर्ष प्रलंबित असलेले महाराष्ट्र दर्शन व प्रवास भत्ते बिल मिळावे, नवनियुक्त शिक्षकांना आपली शैक्षणिक अर्हता वाढवण्यासंदर्भात परवानगी मिळावी, जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी क्रीडा स्पर्धा, विविध उपक्रम यांचे योग्य नियोजन करून शिक्षकांना शाळेत पूर्ण वेळ मुलांना शिकवायला देण्यात यावेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बीएलओच्या कामातून शिक्षकांना वगळण्यात यावे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा बीटस्तरावर घेण्यात यावी, शालेय बदललेल्या वेळेबाबत फेरविचार करण्यात यावा, दोन वर्ष प्रलंबित असलेल्या शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केलेल्या शिक्षकाला नियमित शिक्षक करून थकीत वेतन मिळावे, १९८३ पासून प्रलंबित असलेले निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पदवीधरची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, जिल्ह्यांतर्गत बदलीधारक शिक्षकांना कार्यमुक्त करावी, अशा अनेक मागण्यांसह शिक्षण सेवक मानधन वाढविण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व शिक्षकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पाताडे, सरचिटणीस गिल्बर्ट फर्नाडिस यांनी केले आहे.