94742
माणगाव खोऱ्याच्या विकासाचे ध्येय
नीलेश राणे : ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः आमदार कसा असावा, याचा प्रत्यय प्रत्येक विकासकामातून देणार आहे. माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येतील, अशी ग्वाही आमदार नीलेश राणे यांनी दिली. आमदार राणे यांच्या उपस्थितीत माणगाव खोऱ्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. २५) हा कार्यक्रम झाला. यावेळी माणगाव खोऱ्यातील उपवडे, वसोली, दुकानवाड, मोरे, वाडोस, कांदोळी, महादेवाचे केरवडे, निळेली आदी गावांतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आमदार राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, संदीप कुडतरकर, संजय पडते, बाळू कुबल, प्राजक्ता शिरवलकर, सौ. खोचरे, मथुरा राऊळ, दीपक पाटकर, दिनेश साळगावकर, दीपक नारकर, विनायक राणे, दत्ता कोरगावकर, सचिन धुरी आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांत जास्त प्रक्ष प्रवेश माणगाव खोऱ्यात होत आहेत. याचे सर्व श्रेय जिल्हाप्रमुख सामंत यांना जाते. गेल्या दहा वर्षांत माणगाव खोरे कामांबाबत पिछाडीवर आहे. यासाठी कुठल्याही विकासकामात येथील ग्रामस्थांना न्याय देणार आहे. माणगाव खोऱ्यातील ७० लाखांची विकासकामे ‘डीपीडीसी’च्या माध्यमातून झाली आहेत. प्रस्तावित कामे आगामी अधिवेशनात अग्रक्रमाने मांडून त्यासाठी निधीची तरतूद करणार आहे. येथील लोकांना रोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकल्प, योजना राबविणार आहे. आंजिवडे व घोडगे-सोनवडे घाटरस्त्यांचा प्रारंभ लवकरच करण्यात येईल.’ ठाकरे गटाचे विभागप्रमुख रामचंद्र धुरी यांनी, गेली पंधरा वर्षे येथील विकासकामे रखडल्याने शिवसेनेत प्रवेश करत आहे. यानंतरच्या काळात शिवसेनेत एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले. त्यांच्यासह माजी उपसरपंच यशवंत धुरी, शाखाप्रमुख कैतन फेराव, माजी उपसरपंच अंकुश धुरी, युवा सेनाप्रमुख विशाल धुरी आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.