खेड बसस्थानकाची दुरवस्था
आगारप्रमुखांना निवेदन; पवार व ठाकरे गट आंदोलनाच्या पवित्र्यात
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून खेड बसस्थानकातील दुरवस्थेबाबत आगारप्रमुख राजेशिर्के यांना निवेदन देण्यात आले.
बसस्थानकात पडलेले खड्डे व सार्वजनिक सुलभ शौचालयाची झालेली दुरवस्था, चुकीच्या पद्धतीने केले जाणारे घनकचरा व्यवस्थापन यामुळे प्रवाशांना बसस्थानक परिसरात नाकावर हात घेऊन चालावे लागत आहे. दुर्गंधीमुळे प्रवाशांचे हाल होत असून, शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे बसस्थानक परिसरात फिरताना खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना चालणे कठीण होत आहे.
येत्या १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन तहसीलदार व आगारप्रमुख यांना देण्यात आले आहे. या वेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक निकम, ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख सचिन सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सूरज जोगळे आदी उपस्थित होते.