कोकण

-विपुल वैविध्यपूर्ण लेखनाचे धनी - प्रकाश देशपांडे

CD

प्रासंगिक
rat४p८.jpg -
P२५N९६३९९
प्रकाश देशपांडे

पुण्याच्या स्नेहल प्रकाशनतर्फे देण्यात येणारा यावर्षीचा स्नेहांजली पुरस्कार यंदा साहित्यिक आणि इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे यांना सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी पुण्यात प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने त्यांच्या लेखन कर्तृत्वाची ओळख करून देणारा लेख....

- आसावरी देशपांडे-जोशी
---
विपुल वैविध्यपूर्ण लेखनाचे
धनी - प्रकाश देशपांडे

प्रकाश देशपांडे म्हणजे माझ्या बाबांना वयाच्या ८०च्या टप्प्यावर असताना मिळालेल्या या पुरस्काराचा आगळा आनंद म्हणजे त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी गौरवण्यात येत आहे. आजवर त्यांच्या ग्रंथालय चळवळीतील योगदानाची, इतिहासप्रेमाची, संशोधक वृत्तीची, समर्पित आयुष्याची दखल घेतली गेली; पण त्यांच्या साहित्यिक कार्याची ही दखल सर्वाधिक महत्त्वाची आहे. ‘कथा एका राधेची’ हा एकमेव कथासंग्रह आणि माजी आमदार कै. डॉ. श्रीधर उर्फ तात्या नातू यांच्या ‘दयाघन’ या स्मृतीग्रंथाचं संपादन, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात चिपळूण इथे झालेल्या सत्याग्रहातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती देणाऱ्‍या ‘चिपळूण १९४२’ या ग्रंथाचं संपादन आणि सध्या काम सुरू असलेला आणीबाणी व मिसाबंदीच्या काळात तुरुंगवास सोसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तींचा कोश, एवढीच पुस्तकं त्यांच्या नावावर जमा आहेत; मात्र गेल्या ६ दशकांहून अधिक काळात साहित्याच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी विपुल स्फुटलेखन केले आहे.
मी गुहागरला शाळेत असतापासून तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींबद्दल बाबांनी लेख लिहून त्यांची मतं स्पष्टपणे मांडलेली आहेत. जागृत समाजभान हे बाबांच्या अभिव्यक्तीचं महत्त्वाचं कारण! त्यामुळे पंढरपूरच्या मठांच्या परंपरेबद्दल किंवा गुहागर -पडवेतील धार्मिक दंगल असे विषय त्यांनी हाताळले. त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच लिखाणात विषयवैविध्य आहे. चिपळूणच्या नवीन भैरी मंदिराची निर्मिती आणि त्याबाबतीत झालेली न्यायालयीन लढाई, रा. स्व. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, संघाने काढलेल्या रथयात्रेवर विरोधकांनी लिहिलेल्या लेखाला दिलेलं उपहासात्मक उत्तर, असे राजकारणापासून समाजकारणापर्यंत दोनशेपेक्षा अधिक लेख बाबांनी लिहिले आहेत.
उमेदवारीच्या काळात त्यांनी साप्ताहिक विजयन्त या वैचारिक नियतकालिकाचे सहसंपादक म्हणून काम केलं. उपहास हे त्यांचे प्रमुख अस्त्र. विजयन्तमध्ये सलग दोन वर्ष शंभरेक पद्यात्मक लेख ‘खादी माहात्म्य’ या शीर्षकाखाली त्यांनी लिहिले. शनिमाहात्म्य या धार्मिक ग्रंथाच्या धर्तीवरचं ते उपहासात्मक, राजकीय विडंबनपर लिखाण होतं. बाबांच्या काव्यप्रतिभेला नवरसांपैकी कुठलाच रस वर्ज्य नाही, त्यातही त्यांचा मूळ पिंड रसिकतेचा आहे. त्यामुळे निसर्गकविता, प्रेमकविता हे बाबांच्या कवितांचं प्रेयस आहे; पण इतिहासाची अनन्यसाधारण ओढ हे त्यांच्या काव्यलेखनाचं श्रेयस आहे. त्यांच्या ऐतिहासिक कविता वीररसप्रधान आहेतच शिवाय प्रखर धर्मनिष्ठा (जी बाबांच्या जगण्याचा मूलाधार आहे.) एक महत्त्वाचा पैलू आहे.‌ यांसह त्यांच्या खट्याळ कवितासुद्धा उल्लेखनीय आहेत.
रत्नागिरी आकाशवाणीसाठीसुद्धा बाबांनी विविध लेखन केलं आहे. अनेकविध भाषणं, छोट्या नाटिका त्यांनी लिहून सादर केल्या आहेत. कोकणातील किल्ल्यांची माहिती देणारी बाबांची व्याख्यानमालिका श्रोत्यांच्या विशेष पसंतीस उतरली. शालेय जीवनात अनेक नाटिका, एकांकिका स्वतः लिहून त्यांनी दिग्दर्शित केल्या होत्या.‌ आणीबाणीच्या काळात अकरा महिन्यांच्या तुरुंगवासातही ठाण्याच्या तुरुंगात त्यांनी लेखणीचाच आधार घेतला. कारागृहाच्या स्नेहसंमेलनात एकांकिकेला अचानक परवानगी नाकारली, त्या वेळी लीलाधर हेगडे यांच्या एका प्रसिद्ध लेखावरून उत्स्फूर्तपणे एकांकिका लिहून बाबांनी सादर केली. याच काळात संतांच्या कार्याचा परिचय करून देणारं सावलीनाट्य लिहून सादर केलं. दुर्दैवाने, आज या लिखाणाची प्रत आपल्या हाती नाही. वैयक्तिक मोठेपणासाठी संग्रह आणि नोंदी करण्याबाबत उदासीनता आड आली असावी.
चिपळूणचं लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर म्हणजे जणू बाबांचं अपत्यच! वाचनालयातर्फे वेळोवेळी निघालेल्या स्मरणिका, गौरवग्रंथ यामधूनही त्यांनी लिहिले आहे. कलादालनातल्या तैलचित्रांमध्ये गौरव केलेल्या कोकणरत्नांची माहिती सांगणारी दैनिक सकाळमध्ये ३ वर्षे चाललेली बाबांची लेखमाला त्यांच्या अभ्यासाचे सार आहे. मुळं कोकणात आणि विस्तार देशव्यापी असूनही विस्मृतीत गेलेल्या, ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे, अशा लोकोत्तर व्यक्तींची आठवण लिखाणातून समाजाला करून देताना बाबांची कोकणाप्रती असलेली आत्यंतिक आत्मियता प्रकट होते. समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक नक्कीच दीपस्तंभ ठरेल. सध्या आणीबाणीविषयक हाती घेतलेल्या कोषाचं कामही भावी काळात संशोधकांसाठी महत्त्वाचं आहे. लिहित्या हातांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीमुळे बाबांनी काही पुस्तकांना उल्लेखनीय अशा प्रस्तावना लिहिल्या आहेत. कोल्हापुरातून प्रकाशित होणाऱ्या नवस्नेह मासिकात गेली दहा वर्षं वेगवेगळ्या विषयांचा आढावा घेणारे लेख बाबा लिहितायत. ग्रंथालय चळवळीला बळ देणारे बाबांचे स्वानुभवावर आधारित लेखही वाचनीय आहेत.
डॉ. रा. चिं. ढेरे त्यांच्या एका संशोधनासाठी मुद्दाम बाबांना समवेत घेऊन चिपळूण परिसरात फिरले होते. विश्वास पाटील आजही एखादी ऐतिहासिक कादंबरी असेल किंवा सर्कसवरची कादंबरी असेल, बाबांशी आवर्जून विचारविनिमय करतात. सौमित्रासारखा मनस्वी कवी एखाद्या प्रकल्पावेळी बाबांकडून हव्या असणाऱ्या संदर्भासाठी मुद्दाम चिपळूणला मुक्काम ठोकतो, याला कारण बाबांची संदर्भसंपन्नता हे आहेच; पण कुणीही कधीही कुठल्याही संदर्भासाठी आलं तर हातचं राखून न ठेवता भरभरून देण्याची वृत्तीही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : मीरा भाईंदर: थायलंड-म्यानमार सायबर रॅकेटचा पर्दाफाश

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT