वैभववाडी येथे
विविध कार्यक्रम
वैभववाडीः येथील तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई व ग्रामीण आणि माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बौध्दधम्म अभ्यासक डी. के. पडेलकर यांचे व्याख्यान होणार आहे. सकाळी ११ वाजता धम्म पूजा पाठ, ११.३० वाजता स्वागत व प्रास्ताविक, दुपारी १२ वाजता बौध्दधम्म अभ्यासक डी. के. पडेलकर (देवगड) यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मान्यवरांचे सत्कार, स्नेहभोजन व त्यानंतर तालुक्यातील कलाकार धम्मगीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व धम्म बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामीण शाखेचे अध्यक्ष भास्कर जाधव, शारदा कांबळे, सचिव रवींद्र पवार, रुचिता कांबळे, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, मोहिनी कांबळे यांनी केले आहे.
.................
''पंचायतराज''बाबत
सुकळवाडमध्ये बैठक
मालवण: सुकळवाड ग्रामसचिवालय येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली. अभियानाच्या विविध उद्दिष्टांवर विचारमंथन करून ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गटनिहाय तयारी करण्यात आली. तयार केलेल्या गटांवर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन अभियान प्रभावीपणे राबविण्याचा आणि निर्धारित वेळेत उद्दिष्टे पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला. सुकळवाड येथील ग्रामसचिवालयामध्ये बुधवारी (ता. ८) मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्तरीय विकास समितीची सभा उत्साहात झाली. या सभेमध्ये पंचायत समितीचे कक्ष अधीक्षक श्री. पळसंबकर, ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णा पाताडे, प्रकाश पावसकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत हे अभियान यशस्वी करण्याची दिशा निश्चित करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी यांनी उपस्थित सर्व समिती सदस्यांचे आभार मानले.
.................