बोल बळीराजाचे ......लोगो
(२७ सप्टेंबर टुडे ३)
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात कधी झाला नाही इतका परतीचा मॉन्सून बरसलाय. शेतशिवाराचं अतोनात नुकसान प्रसारमाध्यमांवर पावसापेक्षा जास्त धुमाकूळ घालतंय. कोकणातील भातशेतीही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्येयं. माझा बळीराजा मात्र आपल्या दुःखाचे मार्केटिंग करताना दिसत नाही. हातातोंडाशी आलेली भातशेती पाण्यावर तरंगताना तो रोज पाहतोय. उभ्या भाताच्या लोंबीला आलेले मोड त्याच्याही डोक्यात अश्रू आणतायत; पण कोकणातील आमदार, खासदार सोडा तीन तीन मंत्रीही कुठे शेताच्या बांधावर आलेले दिसत नाहीत. त्यांच्याभोवती फिरणारे आपल्याला अनुकूल आरक्षण नगरपरिषदेत, पंचायत समितीत, जिल्हा परिषदेत कुठे पडतंय का, या विवंचनेत आहेत. मग हा पोटाचा प्रश्न साहेबांपर्यंत पोचायचा तरी कसाय़ ते आता सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी सहज उपलब्ध नाहीत.
- rat१०p१.jpg-
P25N97701
- जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
----
बळीराजाच्या दुःखाचे
रील करून फिरवायचे?
आंबा, काजूसाठी पीककर्ज घेतले जाते. भातशेतीसाठी अगदीच नगण्य कर्ज घेणारा बळीराजा कर्जमाफीची मागणीही करू शकत नाही म्हणून त्याच्या गेल्या चार महिन्यांच्या अविश्रांत कष्टाला काहीच मोल नाही? रासायनिक खतांसाठी मोजलेले पैसे, मजुरीचे दिवस यांच आर्थिक गणित गडीपैरी करून शेती टाकायची नाही, या हट्टाने शेती करणाऱ्यांना विचारा...बरं, आंब्यासारखा पीकविमाही नाही..मग माझ्या बळीराजाने पाच महिने होऊनही पाऊस थांबतच नसेल तर कोणत्या निकषात नुकसान बसवायचं? उर्वरित महाराष्ट्रात पंचनामे, हवाईड्रोन पंचनामे आणि नुसत्या फोटोवर नुकसानग्रस्त ठरवून भरपाईच्या हालचाली जोरात असताना कोकणातील कृषिखाते अॅग्रीस्टॅग आणि यांत्रिकीकरणासाठी आलेला निधी कसा संपवायचा, या विवंचनेत धावत्येय....एकाही लोकप्रतिनिधीकडून माझ्या बळीराजाचे अश्रू पुसायचे राहू द्या. या दुःखाचा साधा उल्लेखही नाही.
माझ्या बळीराजानेच यातून सावरायला हवं. यापुढे पाऊसमान वाढतच जाणार. आता १००-१२० दिवसाची भातपिकं अशीच अडचणीत आणणार..यावर्षीसारखा लवकर पाऊस सुरू झाला तर लगेच पेरे न करता थोडं थांबून पेरे करायला हवे. यंदा आपली बियाणी तरी शिल्लक राहातात की नाही, अशा परिस्थितीत भाताची सद्यःस्थिती आहे. दिवसभरात जमेल तसा सुखवा पाहून थोडं थोडं कापून पीक मिळेल तेवढं तरी पदरात पाडून घ्यायला हवं. मोड न आलेल्या लोंब्याच छान वाळवून बियाणं सांभाळता येईल. मातीची जमीन असेल तर भातातलं पाणी ओढून घेते. पिठुळ झालेलं भात भरडताना खूप मोडतं. यावर्षी वाळवणं-सुकवणं वेळेवर होणार नाहीत. पॉलिथिनच्या पिशवीत भात उबतं..खराब होतं. जुने गोणतेच अशावेळी कामी येतात. अनुभवातून माझा बळीराजा याही परिस्थितीत लढणार..रडणार नाही. संकरित, विकतच्या बियाण्यावर त्याचा विश्वास नाही...तो आपल्या शेतातलं वर्षानुवर्ष जपलेलं बियाणं असं बुडू देणार नाही..हार तर बिलकूल मानणार नाही. पेंढा जमेल तसा नंतर वाळवता येईल. आता पूर्ण नुकसान होताना पाहत राहण्यात अर्थ नाही. नाचणी, वरी आणि पावसाळी कुळीथ, तीळ, उडीद इ. नुकसान कोणाच्या खिजगणतीतही नाही. रोजच्या पावसानं ही पिकं जमिनीला भिडली. हस्त संपला असला तरी अजून पावसाच्या माघारीची काहीच लक्षणं नाहीत. लांबलेला पावसाळा आता आंब्याचं गणितही किती बिघडवेल, सांगता येत नाही. एकदा साफ केलेल्या बागा अजून पंधरवड्यात पुन्हा सफाईला येतील त्याशिवाय त्यात फिरताही येणार नाही. सगळीकडूनच नुकसान आणि खर्चाचे आकडे वाढले की, माझ्या बळीराजाचा अभिमन्यू होऊन जातो. भाताला पूर्वीसारखी चव नाही, असं म्हणणाऱ्यांना या परिस्थितीची जाणीवही नाही.
अतिवदुःखात अश्रूही आटतात. क्षणात भावना बदलणाऱ्या या दिखाऊ दुनियेत माझ्या बळीराजानेच पापणीतले अश्रू ओघळू द्यायचे नाही, हे किती काळ चालणार? कोकणातील खाड्यांमुळे खूप पाऊस पडला तरी काही वेळातच या खाड्यांतून पाणी समुद्राच्या पोटात जातं. मराठवाडा, घाटावरच्यासारखं फुगून राहात नाही. याचा अर्थ, या पावसानं कोकणात काहीच नुकसान होत नाही, असं मानणं म्हणजे माझ्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. समाज नको त्या बाबतीत अतिसंवेदनशील होताना आपण रोज पाहतो मग माझ्या बळीराजाचं दुःखच वेशीवर टांगायची वेळ का येते..? की याचंही ‘रील’ करून आता मीडियावर फिरवायला हवं?
(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.