98267
वीरसिंग वसावे
दाखले वाटपात कुडाळ ‘अव्वल’
मोहिमेस प्रतिसाद; १० हजार ३५६ विद्यार्थ्यांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः राज्याच्या ‘सेवा पंधरवडा-२०२५’ या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत ‘शाळा तेथे दाखला’ मोहिमेच्या माध्यमातून कुडाळ तहसील कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या मोहिमेचा उद्देश विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेली वय-अधिवास व जात प्रमाणपत्रे शाळेतच उपलब्ध करून देणे हा होता. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. यात तहसीलदार कार्यालयाने एकूण १०,३५६ शालेय विद्यार्थ्यांना वय-अधिवास व जात प्रमाणपत्रांचे वाटप करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे, अशी माहिती तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिली.
या मोहिमेच्या यशात महसूल विभागासोबत शिक्षण विभाग, ग्रामपंचायत कार्यालये, सेतू केंद्र चालक तसेच शिक्षकवर्ग यांचा मोलाचा सहभाग राहिला. तलाठी, ग्रामसेवक, शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुलभ पद्धतीने केली. तहसील कार्यालयाच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दस्तऐवज अद्ययावत झाले असून, पुढील प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत शासनाने नागरिकांपर्यंत थेट सेवा पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेत महसूल विभागाने दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे शासनाच्या ‘सुलभ आणि सर्वसमावेशक प्रशासन’ या ध्येयाला बळकटी मिळाली आहे. कुडाळ तहसीलची ही कामगिरी जिल्ह्यातील इतर तहसील कार्यालयांसाठी आदर्शवत ठरली असून, नागरिक सेवेतील महसूल प्रशासनाचे हे एक यशस्वी उदाहरण ठरले आहे.
................
तालुका जिल्ह्यात अग्रेसर
कुडाळ तहसीलने सर्वाधिक प्रमाणात प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे पालक व विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय किंवा सेवा केंद्रात वारंवार चकरा मारण्याची आवश्यकता भासली नाही. महसूल विभागाने शाळांमधूनच अर्ज संकलित करून, तपासणी व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर प्रमाणपत्रांचे वाटप विद्यार्थ्यांना शाळेतच केले. त्यामुळे ‘शाळा तेथे शासन सेवा’ हा उद्देश प्रत्यक्षात साकारल्याचे तहसीलदार वसावे यांनी सांगितले. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी कुडाळ तहसीलने सर्वाधिक प्रमाणात प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. एकूण लक्ष्य १०,३५६ इतके असून, यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. जिल्हास्तरावर एकूण ५४,६०३ विद्यार्थ्यांपैकी ५३,२०३ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली, ज्यामध्ये कुडाळ तालुका सर्वांत पुढे राहिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.