98456
संघटना मजबूत, तर देवगड शहर सक्षम
राजन तेली ः विकास निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः तालुक्यातील शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना ताकद देण्यासाठी कार्यरत राहणार आहे. महायुतीचा धर्म पाळून संघटना बांधणीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आपल्या पक्षाच्या असल्याने वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून शहरासाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यावर भर राहील, असे माजी आमदार राजन तेली यांनी येथे सांगितले.
येथील देवगड जामसंडे शहराच्या संभाव्य प्रारूप विकास आराखड्यामध्ये नागरिकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटातून अलीकडेच शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर श्री. तेली प्रथमच काल (ता. १२) तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी तालुका शिवसेनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. तेली यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते संजय आग्रे, तालुकाप्रमुख विलास साळसकर, अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, संदेश सावंत-पटेल आदी उपस्थित होते. श्री. तेली म्हणाले, ‘शिवसेना पक्ष प्रवेशानंतर पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर संघटना वाढीची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार तालुकानिहाय भेटी घेत आहे. देवगडसह मिठबांवला भेट देणार आहे. महायुतीचा धर्म पाळून पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर राहील.’
ते पुढे म्हणाले, ‘येथील नगराध्यक्षा शिवसेनेच्या असल्याने उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या माध्यमातून शहरासाठी आवश्यक विकास निधीसाठी पाठपुरावा केला जाईल. संघर्ष आपल्याला नवीन नाही. त्यामुळे कठीण परिस्थितीत काम करण्याची सवय असल्याने संघटना वाढीसाठी प्रयत्न राहणार आहे. कार्यकर्त्यांचे प्रशासकीय पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याशी बोलून आवश्यक मार्ग काढला जाईल.’
.................
हरकतींसाठी संपर्काचे आवाहन
येथील संभाव्य शहर प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांना हरकती नोंदवण्यासाठी आवश्यक नमुना येथील संपर्क कार्यालयात उपलब्ध करून देण्यात देईल. नागरिकांनी कार्यालयाला भेट देऊन याची माहिती घेण्याचे आवाहन विलास साळसकर यांनी यावेळी केले.